औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात 24 अपघात १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:14 PM2020-12-29T23:14:12+5:302020-12-29T23:14:21+5:30
१४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या
निखिल म्हात्रे
अलिबाग : रायगड कार्पोरेट जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. या औद्योगिक क्षेत्रात कंपनीमध्ये आग लागून, स्फोट होऊन अपघाताच्या घटना झाल्याने मानवी अपघात, वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ व्यक्ती आणि ६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे कंपनी मालकांनी कामगारांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
रायगड जिल्ह्यात रोहा, महाड, खालापूर, माणगाव, खोपोली, रसायनी या परिसरात जवळजवळ १४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. यामध्ये रासायनिक, औषधनिर्मिता, खतनिर्मिता, स्टील, खाद्यपदार्थ, मद्य अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांच्या घटना होत असतात. यामध्ये आग, प्राणघातक, स्फोट, वायुगळती होऊन अपघात होत असतात. त्यामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते.
रायगड जिल्ह्यात वर्षभरात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांत २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राणघातक १०, आग ७, स्फोट २, वायुगळती ५ असे एकूण २४ कंपनीत अपघात झाले आहेत. प्राणघातक अपघातात १२, आगीत १, स्फोटात २ असे एकूण १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ नागरिकांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून या ठिकाणी वायुगळती, स्फोट, आगीच्या घटना वारंवार होत असतात. मात्र कंपनी प्रशासनाकडून अथवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे अपघात होत असतात. अशा वेळी कंपन्यांची आणि कर्मचारी याची सुरक्षा करणे महत्त्वाचे असते. मात्र अनेक वेळा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना होत आहेत.