मधुकर ठाकूर, उरण: तब्बल २४ तास जेएनपीए समुद्र चॅनल बंद करून मालवाहतूक ठप्प केल्यानंतर जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी आणि जेएनपीए प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे आधी पुनर्वसन करा त्यानंतर चौथ्या बंदरांचा विस्तार करा या मागणीसाठी शुक्रवारी (१) संध्याकाळपासूनच संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल रोखुन बंदराची जहाज मालवाहतूक बंद पाडली होती.
ग्रामस्थांनी समुद्रात छोट्या मच्छीमार बोटी आडव्या टाकून अचानक समुद्र चॅनल बंद पाडल्याने जागतिक स्तरावरील जेएनपीए बंदरातील मालवाहतूकच नव्हे तर बंदरातुन आयात निर्यात थांबली होती.लहानमुले, महिला आणि पुरुष मंडळी मोठ्या त्वेषाने समुद्रात उतरल्याने अखेर जेएनपीए प्रशासनाला माघार घ्यावी लागली. शनिवारी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी कामी आली.पोलिस अधिकारी आणि जेएनपीएचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा झाली.या चर्चेनंतर जेएनपीए प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वासन दिले.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांनी दिली.आंदोलन दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.मात्र तरीही हनुमान कोळीवाडा गावात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल २४ तास बंद पाडल्याने बंदरातील मालवाहतूकच ठप्प झाली होती.अनेक कंटेनर भरलेली जहाजे चॅनल बाहेरच थांबविण्यात आली होती.तर बंदरातील काही जहाजे बाहेर नांगरुन ठेवण्यात आली होती.२४ तास आयात निर्यात व्यापार ठप्प झाल्याने येथील विविध बंदराच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे कोटींवधींचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.