एटीएममध्ये बिघाड करून लांबविले २४ लाख रुपये, ४० दिवस लूट; नागरिकांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:35 PM2024-03-28T12:35:09+5:302024-03-28T12:35:41+5:30
या घटनेमुळे बँक ग्राहक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून बँक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रोहा पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
रोहा : रोह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये दोन चोरट्यांनी बिघाड करून तब्बल २४ लाख ५२ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सलग ४० दिवस एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून या रकमेवर डल्ला मारला.
गजबजलेल्या लोकवस्तीत आणि शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या येथील स्टेट बँक ऑफ इंडिया रोहा शाखेच्या एटीएममध्ये २१ जून २०२२ ते ३० जुलै २०२२ या दरम्यान दोन चोरट्यांनी एसबीआय रोहा येथील ३ एटीएम मशीनमध्ये वेगवेगळ्या व्यक्तीचे डेबिट कार्ड वापरून एटीएम मशीनच्या पैसे बाहेर येण्याच्या स्लॉटमध्ये वस्तू अडकवून मशीनला बाधा करून एटीएममधील अकाउंटमध्ये प्रवेश करून तब्बल २४ लाख ५२ हजार रुपये लंपास केले.
या घटनेमुळे बँक ग्राहक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून बँक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रोहा पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद वायंगणकर पुढील तपास करीत आहेत.