उरणमधील २४ गावे तीन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:40 AM2020-08-08T01:40:52+5:302020-08-08T01:41:15+5:30
शेकडो घरांची पडझड : ग्रामस्थांच्या मदतीने वीज खांबांवर पडलेली झाडे काढण्याचे काम सुरू
उरण : तीन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात विजेचे पोल, विद्युत तारा, ट्रान्सफार्मर उरण तालुक्यात २४ गावे तीन दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत. त्याचप्रमाणे, शेकडो घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विविध ठिकाणी किती झाडे उन्मळून पडली आहेत. या वादळात उरणकरांची लाखो रुपयांची हानी झाली असल्याचा प्राथामिक अंदाज उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी दुपारी चक्रीवादळाच्या तडाख्यात उरण तालुक्यातील शेकडो घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये पडझड झालेल्या आणि घरांवरील पत्रे, कौले उडालेल्या घरांचाही समावेश आहे. अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले होते. आतापर्यंत तालुक्यातील नुकसान झालेल्या १३९ घरांची तपशील उरण तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. माहिती घेण्याचे काम सुरू असून, यामध्ये नुकसानग्रस्त घरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी व्यक्त केली आहे. रौद्ररूप धारण केलेल्या वादळाने उरण परिसरातील अनेक ठिकाणी असलेली सुमारे हजारो झाडे मुळासकट उखडून टाकली आहेत. काही झाडे आणि फांद्या थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर कोसळली आहेत. यामुळे उच्च दाबाच्या आणि गावोगावी वीजपुरवठा करणाºया अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत.
१७ फीडरचे नुकसान : उरण परिसरात झाडे आणि झाडांच्या फांद्या विद्युत पुरवठा करणाºया वीज वाहिन्यांवर कोसळल्याने उच्च दाबाच्या अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत. १७ फीडरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १७ पैकी १५ फीडरचे दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात गुंतले आहेत. या कामी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मनुष्यबळाचीही मदत मिळत असल्याची माहिती उरण महावितरण विभागाचे उपअभियंता हरिदास चोंडी यांनी दिली.