अलिबागच्या २४ महिला भक्तांनी अनुभवली आषाढवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:32 AM2018-07-22T00:32:21+5:302018-07-22T00:33:00+5:30
लिबागमधील २४ भगिनींनी वारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी जायची तयारी केली. त्यासाठी जवळपास महिनाभर त्यांनी पायी चालण्याचा सराव केला.
अलिबाग : ज्येष्ठ महिना आला की, मनात आषाढी वारीचे चित्र उमटू लागते. यंदा अलिबागमधील २४ भगिनींनी वारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी जायची तयारी केली. त्यासाठी जवळपास महिनाभर त्यांनी पायी चालण्याचा सराव केला. जेव्हा त्या सासवड मुक्कामी पोहोचल्या, तेव्हा निसर्गाचा हिरवा, वारकºयांचा पांढरा (पोशाख) तर ध्वजाचा केशरी अशा तीन रंगात माउलींचा तळ सजला होता. तर पालखीचा रथ झेंडू, निशिगंध, मोगरा, गुलाबाने सजवला होता. या चैतन्यमय वातावरणात आमचे पाय वारकºयांच्या दिंडीसमवेत जेजुरीकडे निघाले. प्रत्येक दिंडीतली वारकºयांची शिस्त सर्वांना शिकवण देणारी होती, अशा अनुभव वारीत सहभागी झालेल्या कवयित्री अनिता जोशी यांनी सांगितला.
‘करा शिस्तीचे पालन, माउली देईल दर्शन’ असा भाव प्रत्येक वारकºया ठायी होता. प्रत्येक वारकरी माउलींच्या रस्त्यावर पाय ठेवण्याआधी अगदी वाकून त्या वाटेला नमस्कार करूनच मगच मार्गस्थ होत होता. जागोजागी पाण्याचे टँकर्स, फिरते रुग्णालय, अॅम्ब्युलन्स अशी वारकºयांसाठी सोय प्रशासनाने केली होती. रस्त्यांवर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. हे सर्व अनुभवत १७ ते १८ कि.मी. अंतर पायी पार करून आम्ही २४ जणींनी कधी जेजुरी गाठले, हे कळलेच नसल्याचे जोशी यांनी सांगितले. आमची एक सखी दिंडीसमवेत पुढे गेली होती. तिचा संपर्क होत नव्हता. तिला शोधण्यात बराच वेळ गेला होता आणि आमचे वाहन पुढे येईपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनसमोर असलेल्या आवारात बसून होतो. तेथील सर्व पोलिसांनी आमच्या भोजनाची सोय केली. पुढच्या वर्षी वाल्हे-नीरा-लोणंद हा २२ कि.मी.चा वारीचा टप्पा पूर्ण करायचा या दृढ निश्चय करूनच परतीच्या प्रवासाला लागल्याचे या वेळी जोशी यांनी सांगितले.
३०० पोळ्या करून केली वारकरी सेवा
जेजुरी मुक्कामी अलिबागकर भगिनींनी ३०० पोळ्या करून वारकरी सेवा केल्याचा आनंद घेतला. दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता वाल्या कोळीची समाधी असलेल्या वाल्हेकडे वारी निघाली. सुमारे आठ कि.मी. चालल्यावर माउलींचा रथ दिसला आणि त्यानंतर माउलीच्या समवेतच चालण्याचा योग आला आणि आम्ही साºया जणी धन्य झाल्या.
महिला उद्योग मंडळाच्या शाळेत अवतरली पंढरी
रसायनी : मोहोपाडा येथील महिला उद्योग मंडळाच्या शिशु विकास आणि प्राथमिक शाळेत शनिवार आषाढी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केली होती.
मंडळाच्या अध्यक्षा सरोजिनी साजवान, सचिव सुनंदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व मुख्याध्यापक महादेव पाटील यांनी पालखी व पांडुरंगाच्या मूर्तीचे पूजन केले. हरिनामाच्या गजरात पालखी दिंडी मोहोपाडा बाजारपेठेतून, नवीन पोसरीतील विठ्ठल मंदिरात आली. तेथे विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते सादर केली.