निखिल म्हात्रे, अलिबाग : नऊ प्रकारची ११३ हत्यार बनविणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याकडून बंदूक व काडतुसे बनवण्याचे साहित्य तसेच हरीण व इतर प्राण्यांचे २२ शिंगाचे जोड्या जप्त केल्या आहेत. नवीन वर्षातली पहीलीच ही मोठी कारवाई असल्याची माहीती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत दिली.पत्रकार परीषदेत माहीत देताना घार्गे म्हणाले की, गोपनिय सुत्रांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रोहा शहरातील धनगर आळी येथे अग्नी शस्त्रे बनवित असल्याची माहीती मिळाली होती.
तत्पुर्वी आरोपी तन्मय सतीश भोकटे (वय-24 वर्ष रा.धनगर आळी ता. रोहा ) याची माहीती ही पोलिसांनी घेतली होती. त्याची संपुर्ण माहीती मिळताच सोमवारी स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या टिमला हाताशी धरीत आरोपी तन्मय याच्या मुसक्या आवळल्या.तन्मयच्या रेड हॅन्ड पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे व त्यांचे पथक रोहा येथील धनगर आळीत जावून पथकाने पाहणी केली. त्यांच्या पहाणीत 4 बारा बोर बंदूक,1 देशी बनावटीचे रिव्हॉल्वर,5 धारदार चाकू, 2 धारदार तलवारी, 6 कोयते, 90 जिवंत काडतुसे, 5 रिकामे काडतूस, बंदूक व काडतुसे बनवण्याचे साहित्य, हरीण व इतर प्राण्यांचे 22 शिंगाचे जोड्या जप्त करीत तन्मय सतीश भोगटे यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या घरात शस्त्रे बनविण्यासाठी लागणारे साहित्य सापडल्याने पोलिसांनी ते ही जप्त केले असल्याची माहीती सोमनाथ घार्गे यांनी दिली.आरोपी तन्मय भोकटे विरोधात रोहा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,4,5 (क), (ख), 7 (क), (ख), 25 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (31),48,51 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.तन्मय २४ वर्षाचा असून बंदुका तसेच गोळ्या ह्या स्वतः बनवत होता. या वयात हे शिक्षण त्याने कुठे घेतले हा प्रश्न आहे. त्याच्या घरात मिळालेले साहित्य हे शिकारी साठी वापरणारे असले तरी एवढा मोठा शस्त्र साठा घरात ठेवणे हे घातकच होते. तन्मय याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार आहेत का? तसेच बंदूक, तसेच जनावराची शिंगे कोणाला विकलीत का याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे घेतला जात आहे. तन्मय याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे तपासणे ही गरजेचे आहे.