अलिबाग : जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तहसील कार्यालयांमार्फत त्याचे काम सुरु करण्यात आल आहे. १६ जानेवारीपर्यंत ही प्रक्रीया पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरच या २२४ ग्रामपंचायतीचे बिगूल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अलिबागमधील ३४, मुरूड ४, पेण १८, पनवेल १५, उरण ४, कर्जत ३०, खालापूर ३, रोहा २६, सुधागड ६, माणगाव २१, तळा १८, महाड ३०, श्रीवर्धन १६,व म्हसळयामधील 11 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. गावाचे नकाशे अंतिम करणे, सीमा निश्चित करणे, प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रभाग प्रारुप रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविणे, त्याची दुरुस्ती करून मान्यता देणे अशा अनेक प्रकारची प्रक्रीया आतापर्यंत पार पडली आहे.
४ डिसेंबर ते १६ जानेवारी या कालावधीत प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेणे, अभिप्राय नोंदविणे, अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणे, प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठविली जाणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील या ग्रामपंचायती निवडणुकांचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायती -
अलिबाग तालुक्यातील चेंढरे, वरसोली, थळ, मापगांव, सातिर्जे, आगरसुरे, झिराड, धोकवडे, सारळ, रांजणखार डावली, रेवस, परहूर, चरी, कुरकुंडी कोलटेंभी, शहापूर, आंबेपूर, पोयनाड, श्रीगाव, कुसूंबळे, कुर्डूस, ताडवागळे, कुरुळ, बेलकडे, ढवर, कावीर, सहाण, बामणगाव, बेलोशी, चिंचोटी, बोरघर, रामराज, सुडकोली, वरंडे, चौल या 34 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.