२४० मत्स्य तलावांमध्ये प्रदूषण
By admin | Published: October 22, 2015 12:10 AM2015-10-22T00:10:23+5:302015-10-22T00:10:23+5:30
‘मत्स्य तळ््यांची गावे’ अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, शहाबाज आणि पोयनाड या गावांतील सर्व २४० मत्स्यतळ््यांत गेल्या महिनाभरापासून अचानक मोठी रासायनिक
- जयंत धुळप, अलिबाग
‘मत्स्य तळ््यांची गावे’ अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, शहाबाज आणि पोयनाड या गावांतील सर्व २४० मत्स्यतळ््यांत गेल्या महिनाभरापासून अचानक मोठी रासायनिक प्रदूषणाची समस्या उद्भवल्याने या सर्व तळ््यांतील जिताडा माशांसह रोहू, कटला, मृगल, तिलापिया, खाऊल, कोळंबी या नकदी माशांची मोठ्या प्रमाणात मर्तुक सुरू झाली आहे. या सर्व गावांतील मत्स्योत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
गेल्या महिनाभरात २४० मत्स्यतळी संवर्धक शेतकऱ्यांच्या तळ््यातील सद्य:स्थितीत ६०० रुपये विक्री भाव असलेल्या जिताडा या माशाचे प्रत्येक तळ््यात २०० किलो याप्रमाणे एकूण ४८ हजार किलो जिताडा माशांची मर्तुक झाल्याने गेल्या महिनाभरात प्राथमिक अंदाजानुसार एकूण २ कोटी ८८ लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याची माहिती धामणपाडा शहाबाज येथील मत्स्य तलावधारक व मत्स्यसंवर्धक डॉ. विष्णू पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
शहापूर, शहाबाज व पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांश शेतकरी शेततलावांत आणि भातखाचरांमध्ये माशांचे संवर्धन व विक्री व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या करीत आहेत. स्थानिक बाजारपेठेसह या माशांना पुण्या-मुंबईतही मागणी असल्याने आता पुण्या-मुंबईतही हे मासे पोहोचू लागले व स्थानिक पातळीवर रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध झाले आहे. मात्र या प्रदूषण समस्येमुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध रोजगार साधनालाच घरघर लागली आहे.
खारभूमी विभागाच्या बेफिकिरी व दुर्लक्षामुळे समुद्राचे खारेपाणी शेतात, तलावात शिरते. पीएनपी जेट्टी, जेएसडब्लू स्टील व अन्य कंपन्यांच्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम माशांवर होत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांस नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी डॉ. विष्णू पाटील, प्रवीण म्हात्रे, संदेश शेळके, अरुण धुमाळ, सदानंद पाटील यांनी साहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासह जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अलिबाग तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रदूषणामुळेच मत्स्य मर्तुक
शेतकऱ्यांच्या तक्रारी पोहोचल्यावर मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाच्या तज्ज्ञांनी या २४० बाधित मत्स्यतळ््यांपैकी केवळ १० तळ््यांची पाहणी केली. माशांची मर्तुक तळ््यात आलेल्या तेलकट तवंगामुळे झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यापासून या माशांची प्रदूषणामुळे मर्तुक सुरू झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मत्सोत्पादक शेतकऱ्यांनी २८ सप्टेंबरला तोंडी व १८ आॅक्टोबरला साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयास लेखी तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली.
-------------------------------
वडाळे तलावात आढळले मृत मासे
पनवेल : येथील वडाळे तलावात पालिकेच्या दुर्लक्षामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी (२० आॅक्टोबर) तलावात शेकडो मासे मृत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. पाणी दूषित होऊन या ठिकाणचे मासे मृत्युमुखी पडत आहेत.
2पालिका तलावाकडे लक्ष देत नसल्याची तक्र ार येथील नागरिक करत आहेत. दूषित पाण्यामुळे मासे मृत झाले नसून, वाढत्या तापमानामुळे या माशांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य निरीक्षक दिलीप कदम यांनी सांगितले.