अलिबाग : शालार्थ प्रणाली ठप्प झाल्याने रायगड जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील सुमारे चार हजार शिक्षकांचा २५ कोटी रुपयांचा पगार थकणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये आॅफलाइन प्रणालीचा वापर करून शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागला असला, तरी फेब्रुवारी महिन्याच्या पगाराबाबत सरकारकडून कोणत्याच सूचना अथवा आदेश न आल्याने पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी शिक्षकांच्या पगाराबाबत परिस्थिती निर्माण होणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये ३०२ अनुदानित शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे चार हजार शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतात. वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याने शिक्षकांचे पगार भरसाठ वाढले आहेत. महिन्याचा पगार हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. यासाठी सरकारने शालार्थ प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. यामार्फत शिक्षकांचे पगार केले जातात; परंतु १० जानेवारी २०१८पासून ही प्रणाली ठप्प झाली आहे. याबाबतचे पत्र शिक्षण विभागाला देण्यात आले होते. प्रणाली बंद पडण्यामागे काही तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे जानेवारीचा पगार हा फेब्रुवारी महिन्याच्या २२ तारीख उजाडली तरी झाला नव्हता. मात्र, आॅफलाइन प्रणालीमुळे सुमारे चार हजार शिक्षकांचा सुमारे २५ कोटी रुपयांचा पगार खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे जानेवारीचा प्रश्न आता सुटला आहे, असे अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागाचे प्रमुख सुनील सावंत यांनी सांगितले.शालार्थ सेवा प्रणालीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने पगार उशिरा झाले आहेत, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. आनलाइन प्रक्रिया बंद असल्याने आॅफलाइनद्वारे पगाराची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले होते. त्यानुसार आॅफलाइन पद्धतीने पगार करण्यात आल्याने शिक्षकांना पगार प्राप्त झाले आहेत; परंतु अद्यापही आॅनलाइन प्रणाली ठप्पच आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे पगार आॅफलाइनद्वारे करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले नसल्याने फेब्रुवारी महिन्याच्या पगाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. चार हजार शिक्षकांचे सुमारे २५ कोटी रुपये फेब्रुवारी महिन्यातील पगाराचे थकणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिना हा फक्त २८ दिवसांचाच असल्याने हातामध्ये कमी दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मार्च महिन्यामध्येही शिक्षकांना पगाराची वाट बघावी लागणार असल्याचे बोलले जाते.वाट बघण्यावाचून पर्याय नाहीआॅनलाइन प्रणाली बंद असल्याने आॅफलाइन प्रणालीद्वारे बिले स्वीकारली असती, तर ती वेळेत जमा होऊन १ मार्चनंतर संबंधित शिक्षकांच्या हातात पगार वेळेत मिळाला असता. मात्र, सरकारने कोणतीच सूचना न केल्याने फेब्रुवारी महिन्याच्या पगाराची वाट बघत बसण्यावाचून शिक्षकांकडे काहीच पर्याय नसल्याचे एका शिक्षकाने सांगितले.
शिक्षकांचा २५ कोटी रुपयांचा पगार थकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:08 AM