२५ दुर्मीळ हरणांना मिळाले घर
By admin | Published: January 11, 2017 06:12 AM2017-01-11T06:12:40+5:302017-01-11T06:12:40+5:30
उरण नौदलाच्या अनधिकृत डिअर पार्कमध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या ६१ चितळ जातीच्या दुर्मीळ हरणांपैकी २५ हरणे आता सुरक्षिततेसाठी
उरण : उरण नौदलाच्या अनधिकृत डिअर पार्कमध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या ६१ चितळ जातीच्या दुर्मीळ हरणांपैकी २५ हरणे आता सुरक्षिततेसाठी वैतरण परिमंडळ विभागातील कैरीपाडा येथे हलविली आहेत. या हरणांना नैसर्गिक आवासाची सवय व्हावी, यासाठी वनविभागाचे मागील पाच महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. डिअर पार्कमधील उर्वरित ३६ हरणेही संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि वनक्षेत्रात मुक्त संचारासाठी लवकरच स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती वाइल्ड लाइफ ठाणे वनविभागाचे उपवन संरक्षक दादासाहेब शेडगे यांनी दिली.
उरण येथील नौदल अधिकाऱ्यांनी २४ वर्षांपूर्वी विरंगुळा म्हणून दुर्मीळ चितळ जातीच्या तीन हरणांच्या जोड्या राणीच्या बागेतून येथील नौदलाच्या डिअर पार्कमध्ये पाळण्यासाठी आणल्या होत्या. याठिकाणी हरणांना चारा पाणी देण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी मनुष्यबळाचीही तजवीज नौदल अधिकाऱ्यांनी केली होती. मागील २४ वर्षांत हरणांची संख्या ६१ पर्यंत पोहोचली होती. पाळीव हरणांची संख्या बेसुमार वाढल्याने त्यांना स्वैरविहार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. तसेच त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शिवाय देशाची सुरक्षा हेच महत्त्वाचे ध्येय असलेल्या नौदलाकडे हरणांच्या देखभालीकडे मनुष्यबळ वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे हरणांच्या देखाभालीकडे नौदलाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत स्थानिक वन अधिकाऱ्यांनीही वरिष्ठांकडे विचारणा करीत, दुर्मीळ हरणे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मागील चार-पाच वर्षांपासून नौदल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी नॅशनल पार्क, राणीची बाग येथील उद्यानातही हरणे स्थलांतरीत करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, अपुरी जागा आणि इतर काही तांत्रिक अडचणींमुळे डिअर पार्कमधील ही हरणे नैसर्गिक आवासात स्थलांतरीत करण्यात विलंब होत होता.