पेणमधून २,५०० दुर्गामूर्तींचे प्रयाण सुरू
By Admin | Published: October 10, 2015 11:49 PM2015-10-10T23:49:32+5:302015-10-10T23:49:32+5:30
नवरात्री उत्सवाच्या नवरंगांची उधळण करण्याची वेळ समीप येऊन ठेपली असताना पेणच्या कार्यशाळेत नवदुर्गांच्या मूर्तीवर अखेरचा कुंचला फिरविण्यात मूर्तिकार दंग आहेत. सार्वजनिक
पेण : नवरात्री उत्सवाच्या नवरंगांची उधळण करण्याची वेळ समीप येऊन ठेपली असताना पेणच्या कार्यशाळेत नवदुर्गांच्या मूर्तीवर अखेरचा कुंचला फिरविण्यात मूर्तिकार दंग आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या दुर्गामातेच्या मूर्तीवर साजशृंगार चढवून कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत मूर्तीचे प्रयाण होऊ लागले आहे. पेण शहर व हमरापूर जोहे कलाग्राममधून तब्बल २,००० ते २,५०० मूर्ती रवानादेखील झाल्याचे कार्यशाळांमधील सूत्रांनी माहिती देताना सांगितले. याशिवाय गावोगावाची आद्यशक्ती व ग्रामदेवतेच्या मंदिराची रंगरंगोटी, सजावट होऊन नवरात्री उत्सवाची जोरदार तयारी झाली आहे. एकंदर मंगळवारपासूनचे १० दिवसांचा उत्सवाचा आनंद उपभोगण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे चित्र आहे.
नवरात्रोत्सवाचा आद्यशक्तीचा नऊ दिवस चालणारा जागर व त्यातून होणारा उत्सवाचा माहोल उत्साही असतो. भारतीय संस्कृतीत घटस्थापनेद्वारे स्त्रीशक्तीची उपासना व जागर करण्याची प्राचीन कालखंडापासूनची चालत आलेली परंपरा आजतागायत सुरू आहे. उत्तरोत्तर या उत्सवाचा थाटमाट वाढत आहे. मंदिरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची जागा आता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडपात येऊन ठेवलीय. ह्यात आदिवासी समाज असो की प्रगत हायप्रोफाइल सोसायटीमधील समाज. गरबा, दांडिया यावर थिरकरणाऱ्या तरुणाईच्या बेधुंद पावलांनी हा इव्हेंट लोकप्रिय झाला आहे. आकर्षक फॅन्सी ड्रेस, बेधुंद संगीत व रात्रभर आद्यशक्तीचा जागर यामधून जगतजननीचा चालणारा हा उत्सव आता महोत्सव झालाय.
महाराष्ट्रात आद्यशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. सोलापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, नांदेड माहुलगडावरील रेणुकामाता या तीन शक्तिपीठांबरोबर सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता अर्धपीठ अशी विभागणी आहे. याबरोबर आद्यशक्ती तेथील ग्रामसंस्कृतीच्या नावाने रूढ आहेत. याशिवाय काळभैरव, बहिरीदेव गावच्या वेशीवरचे देव, कुळदैवत मल्हारी मार्तंड या सर्वांचा नवरात्रीत नऊ दिवसांचा जागर सर्वभाविक आनंदाने साजरा करतात. (वार्ताहर)