कर्जतमध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी केली २,५०० वृक्षांची लागवड; राहुल धारकर महाविद्यालयाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:36 PM2019-12-13T22:36:09+5:302019-12-13T22:38:36+5:30
राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय गेली दहा वर्षे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहे.
कर्जत : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने जून २०१९ मध्ये वृक्षारोपण सुरू केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकूण २,५०० रोपांची लागवड केली. खरे तर महाविद्यालयात ३९० विद्यार्थी आणि ५५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. संख्येच्या तुलनेत सहापट वृक्ष लावून त्यांचे संवर्धनही सुरू आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी महाविद्यालयाला पुरस्कार देऊन सन्मानित केले.
राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय गेली दहा वर्षे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहे. नुसते वृक्षारोपण न करता दरवर्षी एक झाड विद्यार्थ्यांना दत्तक देतात. यंदा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेपेक्षा अधिक रोपांची लागवड व त्यांचे संवर्धन करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी विशेष सभेचे आयोजन करून ही संकल्पना चांगल्या प्रकारे राबविण्याचे ठरविले. या संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी प्रा. प्रीतम जुवाटकर यांच्याकडे दिली. त्यांनी विविध कल्पना साकारून या उपक्रमाला सार्थ स्वरूप दिले.
जून २०१९ च्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून प्रामुख्याने विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया शिधये, स्टर्लिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. गाडगे, रायगड मेडिकल संघटनेचे अध्यक्ष लीलाधर पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहायक आयुक्त डॉ. साहेबराव साळुंखे, संतोष घोडविंदे आदी उपस्थित होते. दहा दिवस हा उपक्रम राबवून एकूण अडीच हजार रोपांची लागवड केली. तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली.
विशेष म्हणजे, या उपक्रमाला महाराष्ट्र शासन वन विभागाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या यशस्वी मोहिमेबद्दल अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी पुरस्कार जाहीर केला. नवी दिल्ली येथे महाविद्यालयाच्या वतीने प्रा. प्रीतम जुवाटकर उपस्थित होते. अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते महाविद्यालयाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.