रायगडमधील २५३ शेतकरी कृषी पंप वीजजोडणीस वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:43 AM2019-05-08T06:43:39+5:302019-05-08T06:43:49+5:30
रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही.
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही. मात्र, शेतकºयाचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आॅनलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारून कारवाई करीत असल्याचा दावा वीज वितरण कंपनी करीत आहे.
वीज वितरण कंपनीच्या संगणक आज्ञावलीमध्ये आॅनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीमुळे तसेच सौरऊर्जेवर आधारित पंप देण्याच्या योजनेच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज प्रलंबित असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता एम. एम. मुंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरिप हंगाम पूर्व जिल्हास्तरीय बैठकीत दिली आहे.
३१ मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात एकूण १७ हजार २५२ वीजजोडणी झालेली आहे. मार्च २०१८ अखेर ५२१ वीजपंप अर्ज पैसे भरून प्रलंबित होते. मार्च २०१९ पर्यंत त्यापैकी ३८७ पंपांना वीजजोडणी दिलेल्या असून, २५३ वीजजोडणी प्रलंबित आहेत. याबाबतची कारणे जिल्हाधिकाºयांनी विचारली असता, उप कार्यकारी अभियंता मुंडे यांनी पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या २५३ शेतकºयांना लवकरात लवकर वीजजोडणी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
किमान वीज बील भरावे लागणार
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्याच्या आत या जोडणी मिळण्याची शक्यता नाही. परिणामी, पाऊस सुरू झाल्यावर कृषी पंपांना वीज मिळाली तरी पंपांचा वापर शेतीला करावा लागणार नाही. मात्र, किमान येणारे वीज बिल शेतकºयांना भरावे लागणार आहे. यामुळे श्रमिक मुक्ती दल संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी वीज वितरण कंपनीच्या या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.