नऊ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीच्या 26 तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:01 AM2020-11-25T01:01:16+5:302020-11-25T01:01:34+5:30
बनावट फोन कॉल करून घातला जातो गंडा; एका तक्रारीचा तपास पूर्ण
निखिल म्हात्रे
अलिबाग : बनावट फोन कॉल करून एटीएम व बँक खात्याची माहिती विचारून खात्यातून ऑनलाइन रक्कम परस्पर लांबवण्यासह मागील नऊ महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीच्या २६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील एका तक्रारीचा तपास पूर्ण झाला आहे तर उर्वरित २५ तक्रारींचा तपास सुरू आहे.
लॉटरी लागल्याचा अचानक येणारा ई-मेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम, विविध फ्राॅड कंपन्यांचे येणारे मेसेज आदी मोहाच्या सापळ्यात शेकडो जण अडकतात. अशी रक्कम आपल्याला का आणि कोण देणार, याचा विचार केला जात नाही. त्यासाठी ओटीपीपासूनची माहिती लगेचच पुरविली जाते. नंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे नागरिकांनी फेक काॅल्सला बळी पडू नये. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे अवाहनही रायगड पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलवरून ई-व्यवहार करताना खाचाखोचा ठाऊक नसतात. भामटे फायदा उठवितात.
ऑनलाइन गंडा
ऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करण्यात येते. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबँकिंगच्या माध्यमातून पैसेदेखील देतात; मात्र अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू येते.
ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातात
अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाणे अडचणीचे होते. बऱ्याचदा एकटेदुकटे ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातात. ई-साक्षरतेचा अभाव घातक ठरू शकतो. त्या अज्ञानामुळे हे भामटे तुमची आयुष्यभराची पुंजी पळवू शकतात. जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बँक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले? जातात, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात.
डायल
करा १००
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला १०० नंबरवर कॉल
करुन माहिती द्यावी.