जिल्ह्यात यंदा २६८ सार्वजनिक गणेशोत्सव; महामार्गावर २४ सीसीटीव्हीची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:50 PM2018-09-07T23:50:07+5:302018-09-07T23:50:21+5:30
येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात २६८ सार्वजनिक तर ९९ हजार ९२ घरगुती गणपतींचे आगमन आहे तर १५ हजार ६६७ गौरींचे आगमन शनिवार, १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : येत्या १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात २६८ सार्वजनिक तर ९९ हजार ९२ घरगुती गणपतींचे आगमन आहे तर १५ हजार ६६७ गौरींचे आगमन शनिवार, १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्वाधिक ३८ सार्वजनिक गणपती खोपोलीमध्ये तर सर्वाधिक ८ हजार ६९९ घरगुती गणपती माणगावमध्ये आहेत. मुरुड आणि म्हसळा येथे एकही सार्वजनिक गणपती नाही.
१३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरु होत असून त्याकरिता गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या सुरक्षित प्रवासासाठी रायगड वाहतूक पोलीस विभागाने महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या टप्प्यात पोलीस बंदोबस्तासह अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वाहतूक नियंत्रण व्यवस्था तैनात केली आहे. सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सह. पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, २९७ पोलीस कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गावर
२४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
गणेशोत्सव बंदोबस्तांतर्गत गोवा राष्ट्रीय महामार्गावर एकूण २४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत, त्यायोगे वाहतूककोंडी टाळून वाहतूक सुरळीत सुरु ठेवणे सुकर होणार आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गावर जिते, हमरापूर येथे प्रत्येकी दोन, पेण-खोपोली बायपास येथे तीन, रामवाडी चौकी व कांदळेपाडा येथे प्रत्येकी दोन, इंदापूर बस स्टॅन्ड येथे तीन, लोणेरेफाटा येथे दोन, नातेखिंड येथे तीन, विसावा हॉटेल येथे दोन आणि पाली शहरात तीन असे एकूण २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
१२ ठिकाणी रुग्णवाहिका तर ११ ठिकाणी क्रे न व टोइंग
गोवा राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्यावर तत्काळ उपाययोजनेकरिता १२ ठिकाणी रु ग्णवाहिका तर ११ ठिकाणी क्रे न व टोइंग कारची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव कालावधीत मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदीबाबत गृहमंत्रालयाकडून आदेश लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
हिंदू बांधवांचा गणेशोत्सव सण तर मुस्लीम बांधवांचा मोहरमचा सण शांततेत पार पाडण्यासाठी रायगड जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी यांनी १ हजार ५३ गाव भेट घेतल्या असून गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता व मोहल्ला समित्यांच्या २७६ बैठका घेतल्या आहेत. रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता शुक्रवारपर्यंत ७०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.