लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दरडग्रस्त तळीये गावाचे शासनामार्फत पुनर्वसन करण्यात येत आहे. म्हाडामार्फत २७१ घरे बांधली जात आहेत. मात्र ६६ घरे बांधून देतानाच म्हाडाची दमछाक झाली आहे. उर्वरित घरांसाठी अजून किती वाट पाहावी लागणार, असा सवाल तळीयेकर करीत आहेत. २१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळली. यात ९० जणांचा मृत्यू झाला आणि पूर्ण गाव दरडीखाली गेले होते.
६६ घरांची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात घराबाहेरील सुविधांची कामे अपूर्णच आहेत. घराबाहेरील पिचिंग, ड्रेनेज आणि इतर कामांसाठी निधी मंजूर नसल्याने ही कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यापूर्वी तळीयेकरांचा गृहप्रवेश होईल, असे जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने गृहप्रवेश लांबणीवर गेला आहे. वृत्तपत्रांनी यावर आवाज उठविल्यानंतर अखेर ६६ घरांची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आलेली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरले असून, यंदाचा पावसाळा कंटेनरमध्ये राहूनच काढावा लागत आहे. शासन, प्रशासनाने तळीयेमध्ये येऊन आम्ही कसे राहतो हे पाहावे, अशी संतप्त भावनाही ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.
पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा अर्धवट काम केलेल्या घरांमध्ये राहायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच बांधण्यात आलेली आधुनिक पद्धतीची घरे ही ग्रामस्थांना अडचणीची ठरत आहेत. ग्रामस्थांनी पारंपरिक घरे देण्याबाबत मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.
रस्ते, पाणीपुरवठ्याचे काय?६६ घरांची कामे पूर्ण झाली असली तरी जिल्हा परिषदेमार्फत होणारे रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची कामे अपूर्ण राहिली आहेत. दोन वर्षांपासून दरडग्रस्त कुटुंबे कंटेनरमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेली सुविधाही अपुरी आहे.