कडसुरेमध्ये २८ लाखांचा अपहार
By admin | Published: January 9, 2017 06:24 AM2017-01-09T06:24:47+5:302017-01-09T06:24:47+5:30
ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार
नागोठणे : ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार केल्याप्रकरणी विभागातील ग्रामपंचायत कडसुरे (ता. रोहा) येथील तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे आणि माजी सरपंच बाळा पिंगळा या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोरखनाथ वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. या प्रकरणात तत्कालीन सरपंच पिंगळा यांना नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
२०१३ ते २०१५ या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे (रा. झोतीरपाडा) आणि सरपंच बाळा पिंगळा (रा. कागदावाडी) यांनी कडसुरे ग्रामपंचायतीचा ग्राम निधी, १३ वा वित्त आयोग निधी, पाणीपुरवठा आदी खात्यातील शासकीय रकमेचा अपहार केला असल्याची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. अपहाराची रक्कम २८ लाख २५ हजार २७९ रु पये इतकी प्रचंड आहे. शासकीय रकमेचा तपशील न ठेवता त्यांनी खोटे हिशेब तयार केल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या प्रकरणात बाळा पिंगळा यांना ६ जानेवारीला पोलिसांनी ताब्यात घेऊन शनिवार, ७ जानेवारीला रोहे न्यायालयात हजर केले असता, १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रमोद तरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी माणगावच्या सेशन कोर्टात अर्ज दाखल केला असून १३ जानेवारीला संबंधित तारीख असल्याचे पोलीससूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. पिंगळा यांचे विरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. पो. नि. संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.