चौपदरीकरणासाठी २८२ कोटींचा निधी
By admin | Published: July 18, 2015 11:59 PM2015-07-18T23:59:24+5:302015-07-18T23:59:24+5:30
चौपदरीकरणासाठी २८२ कोटींचा निधी
- अमोल पाटील, खालापूर
मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील शीळफाटा ते बोरघाटपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले नसल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत होती. आमदार सुरेश लाड यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तत्कालीन बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे आश्वासन दिल्याने लाड यांनी उपोषण स्थगित केले. रस्त्याच्या कामासाठी २८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील शीळफाटा ते खोपोलीदरम्यानचा रस्ता अरुंद असून चौपदरीकरण झाले नसल्याने सतत वाहतूक कोंडी होते. अखेर रुंदीकरणाच्या कामाला केंद्र शासनाने मंजुरी दिली. रस्त्यावरून धावणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने व रस्ता अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. शीळफाटा ते खोपोलीदरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग एकेरी राहिला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्र मणे झाली आहेत. या मार्गाचेही रुंदीकरण व्हावे, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
शीळफाटा ते खोपोली दरम्यानचा रस्ता खूपच अरुंद असल्याने अपघातांची संख्या वाढली होती. यामध्ये स्थानिक तरुणांचा बळी जात होता. त्यामुळे आपण या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. रस्त्याच्या कामासाठी २८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. आज अखेर या कामाला मंजुरी मिळाल्याने खोपोलीकरांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
- सुरेश लाड, आमदार