क्रीडा स्पर्धेत २८७ विशेष विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:21 AM2017-12-06T01:21:03+5:302017-12-06T01:21:03+5:30
रायगड जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि पेण येथील आई डे केअर संस्था संचालित मतिमंद मुलांचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जागतिक
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि पेण येथील आई डे केअर संस्था संचालित मतिमंद मुलांचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील १४ विशेष विद्यार्थी शाळांतील २८७ विद्यार्थ्यांनी आपला विक्रमी सहभाग दिला.
पेण नगरपालिकेच्या सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलात आयोजित या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम ललित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. धावणे, लांब उडी, स्पॉट जॅप, गोळाफेक, सॉफ्ट बॉल थ्रो, बादलीत बॉल टाकणे आदी खेळांतून विद्यार्थ्यांनी खूप आनंद लुटला. क्रीडा स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट झाल्याबद्दल समाजकल्याण अधिकारी ए.एस. लेंडी यांनी आई डे केअरचे विशेष आभार मानले.
स्पर्धेच्या सर्व नियोजनामागे आई डे केअरचे कर्मचारी, विविध शाळा, कॉलेजचे शिक्षक आणि स्वयंसेवक व हितचिंतक आदींचा सक्रिय सहभाग असल्यामुळे या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडण्यास मदत झाल्याचे आई डे केअर संस्थेच्या स्वाती मोहिते यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी एस.एस. लेंडी, सहायक सल्लागार किशोर वेखंडे, हायकल कंपनीचे विशाल पाटील आणि सिमरन शेख, रामेश्वर कन्स्ट्रशन ग्रुपचे राजू पिचीका, रोटरी क्लब आॅफ पेण ओरयनचे आशिष झिटे, रोटरी क्लब पेणचे रोहन मनोरे आदी मान्यवर उपस्थित होते.