लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : विकासकामासाठी कर्नाळा अभयारण्य परिसरात असलेल्या खासगी जागेतील झाडांची बेकायदा वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे. २० वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली तब्बल २९ झाडे वनविभागाची कोणातीही परवानगी न घेता तोडल्याने वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.तारा गावाच्या हद्दीत कर्नाळा अभयारण्याच्या परिसरातील रूपतारा भागात १२ एकर जागेत ही झाडे तोडण्यात आली आहेत. रितू एम. के. अजातशत्रू सिंह यांच्या मालकीच्या जागेवर हा प्रकार घडला आहे. २९ झाडे तोडल्याने कर्नाळा परिसरातील समाजसेवक संतोष ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठाकूर यांनीच हा प्रकार वनविभागाच्या निदर्शनास आणला. १२ एकर जमिनीवर कंटेनर यार्ड उभारण्याच्या उद्देशाने झाडे तोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. झाडांचा पंचनामा सुरू असून मालकांकडून दंड आकारला जाईल.वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्हवनविभागाने या जागेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणारे स्थानिक आदिवासी बाळाराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जागेच्या मालकाला डावलून गरीब आदिवासी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल केल्याने या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जागा मालक हरयाणा येथे वास्तव्यास असल्याने अद्याप त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे कर्नाळा परिसरातील वनपाल बी.डी. कांबळे यांनी दिली.
खासगी जमिनीवरील २९ झाडे तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:31 AM