अलिबाग : रायगड जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने विविध ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून तब्बल २९९ ठिकाणचे रस्ते मोकळे केले आहेत. त्यामुळे आपद्ग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. प्रशासनाप्रमाणे काही ठिकाणी ग्रामस्थांनीही स्वत:च्या हिमतीवर झाडे तोडून रस्ते वाहतुकीला खुले केले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका दिला आहे. लाखो घरांची पडझड झाली तर, हजारो घरांचे छप्पर उडाले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्ष कोसळले होते. झाडे रस्त्यांमध्येच पडल्याने रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे आपद्ग्रस्तांना मदत पोहोचविणे कठीण होत होते. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत मदतकार्य पोहोचण्यासाठी, दळणवळणासाठी हे बंद पडलेले रस्ते खुले करणे गरजेचे होते. याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली.कार्यकारी अभियंता (अलिबाग), कार्यकारी अभियंता (पनवेल), कार्यकारी अभियंता (महाड), सर्व प्रांताधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी यांची टीम तयार केली. त्यामध्ये कर्मचारीही होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या जिल्हा पोलीस प्रशासनाची आणि एनडीआरएफच्या पथकांनी युद्धपातळीवर काम केले. प्रत्येक तालुक्यात साधारणत: १४ ते १५ पथके तर नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रात २ ते ३ पथके तयार करण्यात आली. एका पथकात साधारण ३ ते ४ जणांचा तर नगरपालिका क्षेत्रात ४० ते ४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे या कामासाठी ग्रामीण भागात जवळपास ६० जेसीबी आणि ४० वूडकटर्स तर नागरी भागात २० ते २२ जेसीबी, ६० वूडकटर्स तसेच ४५ ट्रॅक्टर्स वापरण्यात आले. दरम्यान, वादळाच्या पहिल्या आणि दुसºया दिवशी काही ग्रामीण भागांमध्ये ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मेहनत घेत रस्त्यांमधील झाडे कापून, तोडून बाजूला केली.वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या रस्त्यांची माहितीकार्यकारी अभियंता (बांधकाम) रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेले बंद पडलेले १९१ रस्ते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागच्या अंतर्गत असलेले ३३ बंद पडलेले सर्व रस्ते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेलच्या अंतर्गत बंद पडलेले २६ रस्ते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडच्या अंतर्गत बंद पडलेले ४९ रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे चक्रीवादळामुळे झाडे पडून खंडित झालेली वाहतूक पूर्णपणे सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.