श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:17 AM2018-09-16T04:17:03+5:302018-09-16T04:17:21+5:30
टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न निकाली; ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा
श्रीवर्धन : राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील नऊ गावांसाठी तीन कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत.
श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५०४० च्या जवळपास आहे. तालुक्यात एकूण ७८ गावे वसलेले आहेत. वाळवंटी, धनगरमलई, कासारकोंड, वडशेत, वेळास, साखरी, कोंडविल, शेखाडी व वाकळघर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे.
श्रीवर्धन तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे. तलाव, बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत. मारळ व वडशेत वावे या ठिकाणचे कोट्यवधी रु पयांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. शेतीस पूरक वातावरण आहे; परंतु कायमस्वरूपी जलस्रोतांची कमतरता आहे. श्रीवर्धनमध्ये यंदा उन्हाळ्यात जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. कासारकोंड, साक्षी भैरी (हरिहरेश्वर), धनगरमलई, नागलोली या गावातील लोकांना पाण्यासाठी गावापासून दोन-दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी जावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दोन दिवसांत गावांना पाणीपुरवठा करण्यात आला.
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. वारंवार मागणी केल्यामुळे तालुक्यातील नऊ गावांना राष्ट्रीय पेयजल अंतर्गत निधी मिळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पाठपुरवठा करून निधी प्राप्त करून दिला आहे .
- दर्शन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, श्रीवर्धन