आदिवासीवाडीतील रस्त्यासाठी ३ कोटींचा निधी खर्च
By admin | Published: June 18, 2017 02:04 AM2017-06-18T02:04:05+5:302017-06-18T02:04:05+5:30
पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून नागोठणे ते लाव्याची वाडी रस्ता तयार करण्यात आला असून, त्यासाठी ३ कोटी २४ लाख रु पये निधी खर्च करण्यात आला
- लोकमत न्यूज नेटवर्क
नागोठणे : पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून नागोठणे ते लाव्याची वाडी रस्ता तयार करण्यात आला असून, त्यासाठी ३ कोटी २४ लाख रु पये निधी खर्च करण्यात आला आहे. हा सात कि.मी.चा रस्ता आदिवासीवाड्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे पाच वाड्यांच्या विकासासाठी हा मार्ग ठरला पाहिजे, असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.
कार्यक्र माला रायगड जि. प.चे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जि. प. सदस्य किशोर जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता मैथिली बरमदे, रोहे पं. स. सदस्य संजय भोसले, बिलाल कुरेशी, नागोठणे सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, ग्रा. पं. सदस्य प्रकाश मोरे, लिंबाजी पिंगळे, कीर्तिकुमार कळस, पिगोंडे ग्रा. पं.च्या सरपंच शैला बडे, आदी उपस्थित होते.
देशातील ७० टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहात आहे. खेड्याचा विकास झाला, तर राज्याचा विकास होत असल्याने सामान्य माणसाला जोडणारी ही योजना येथे राबविण्यात आली आहे. केलेल्या रस्त्याच्या देखभालीची, तसेच दुरु स्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावत असून, विकासाची गंगा ग्रामीण भागातही वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्र माला येताना रस्ता खराब असल्याने आतापेक्षा तिप्पट जास्त वेळ खर्ची पडला होता. नागोठणे विभागातील रस्ते आणि मोऱ्यांच्या कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत २ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आल्याचे किशोर जैन यांनी सांगितले.