विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट ३ कोटींचे अनुदान, आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीत रायगड गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:40 AM2017-10-24T03:40:42+5:302017-10-24T03:40:45+5:30
अलिबाग : गेल्या तीन वर्षांत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे दिसून येत आहे
जयंत धुळप
अलिबाग : गेल्या तीन वर्षांत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २६ लाख ३४ हजार २०० असून, त्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या ११.५८ टक्के म्हणजे ३ लाख ५ हजार १२५ आहे. जिल्ह्यातील १६ शासकीय आश्रमशाळांतील ४ हजार ४८३ तर १३ शासकीय वसतिगृहातील ४ हजार ४९७ अशी एकूण ९ हजार ९८० आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शासकीय योजनेप्रमाणे एकूण ३ कोटी १९ लाख २९ हजार ९०० रुपयांचे अनुदान थेट जमा झाले असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
डीबीटी योजनेंतर्गत पहिली ते चौथीच्या आदिवासी विद्यार्थ्यास ७ हजार ५०० रुपये, पाचवी ते नववीच्या आदिवासी विद्यार्थ्यास ८ हजार ५०० रुपये, तर दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यास ९ हजार ५०० रुपये शासकीय अनुदान देण्यात येते.
।अकरा आश्रमशाळांना शासकीय जमीन उपलब्ध
जिल्ह्यातील १६ आश्रमशाळांपैकी ११ ठिकाणी शासकीय जागा प्राप्त झाल्या असून, ७ इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत. १३ शासकीय वसतिगृहांपैकी ११ वसतिगृहांकरिता शासकीय जागा प्राप्त झाल्या असून, तेथेही लवकरच इमारतींचे काम सुरु होणार आहे. दरम्यान, ५ शासकीय आश्रमशाळा व एक अनुदानित आश्रमशाळा यांना आयएसओ मानांकने प्राप्त झाली आहेत.
आश्रमशाळांमध्ये आधुनिक सुविधा
१० शासकीय आश्रमशाळांना वॉशिंग व ड्रायक्लीनिंग मशिन, ८ शासकीय शाळांना सॅनिटरी नॅपिकन डिस्पोझल मशिन (इन्सिनेटर) तर ६ शासकीय आश्रमशाळांना स्टीम कुकिंग सीस्टिमदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कौशल्य विकास योजनेंतर्गतदेखील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
न्युक्लिअस बजेटअंतर्गत १ कोटी ५२ लाखांचा निधी
न्युक्लिअस बजेट योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायांसाठी १ हजार ७८३ लाभार्थ्यांना १कोटी ५२ लाख २१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. काही आश्रमशाळांवर डिजिटल क्लासरूम अंतर्गत ई-लर्निंगचे प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांकरिता ग्रीन व्हील, तसेच सुसज्ज व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
।२०१७-१८ मधील शैक्षणिक स्थिती
अ.क्र . तपशील एकूण संख्या पटसंख्या
१ शासकीय आश्रमशाळा १६ ५३०९
२ शासकीय वसतिगृहे १३ ११०२
३ अनुदानित आश्रमशाळा १० ५०६४
४ अन्य आश्रम शाळा ०३ ९४९
एकूण ४२ १२४२२
गेल्या तिन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांची अवस्था गंभीर होती, परंतु या तीन वर्षांत या परिस्थितीत मोठा बदल दिसून येत आहे. आदिवासी क्षेत्रात कार्यरत संस्था आणि कार्यकर्त्यांनी केलेला पाठपुरावा हादेखील यामध्ये महत्त्वाचा आहे.
- अशोक जंगले, सामाजिक कार्यकर्ते, दिशा केंद्र, कर्जत.