रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 06:52 AM2018-06-19T06:52:31+5:302018-06-19T14:47:31+5:30

विषबाधा झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

3 died due to food poisoning in mahad | रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

- नितीन भावे
खोपोली - वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कल्याणी शिंगोले (वय 7 वर्ष ), ऋषिकेश शिंदे (वय 12 वर्ष ) आणि प्रगती शिंदे ( वय 13 वर्ष) या तीन लहानग्यांचा विषबाधेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे. तर 15 ते 16 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पनवेलमधील एमजीएम, डीवाय पाटील, अष्टविनायक, गांधी, लाइफ लाईन, प्राची, उन्नती,  सायन या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना हलवण्यात आले आहे.  
खालापूर तालुक्यातील देवन्हावे  येथील सुभाष रामचंद्र माने (माळी) यांनी महडच्या गावठाणमध्ये बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम सोमवार (18 जून) पार पडला. यावेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवण तयार झाले. सर्व पदार्थ घरातच बनवण्यात आले होते.  दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली जेवणाची पंगत रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होती. साधारणता 250 जणांचे जेवण बनवण्यात आले होते. 

कार्यक्रम संपल्यानंतर अचानक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास माने यांच्या पत्नी व मुलीला उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. यानंतर  महड, साजगाव, देवन्हावे, खोपोली येथून वास्तूशांतीसाठी गेलेली पाहुणे मंडळी एकामागून एक अशी खोपोलीतील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागली. परंतू, एकंदर परिस्थिती पाहता सर्वांनाच विष बाधा झाल्यानं सर्वांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे होते. डॉ.रणजीत मोहिते यांनी पार्वती हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्णांवर प्रथोमपचार केले व जे अत्यव्यस्थ  होते त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु मध्यरात्री सर्व रुग्णांवर उपचार करणं शक्य नसल्याने खोपोलीतील सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी एकत्र आले आणि संयुक्तरित्या आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न केला.  

'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 'या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला, अन्यथा मृतांचा आकडा अजूनही वाढला असता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अजित गवळी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उरलेले जेवण तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महड परिसरावर शोककळा पसरली आहे. 

पत्नीचा त्रास पाहिला, अन्...
सध्या उपचार सुरू असलेल्यांमध्ये अनिता गायकवाड (वय 45 वर्ष) आणि निकिता गायकवाड (वय 17 वर्ष) या मायलेकींचाही समावेश आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अनिता यांचे पती नवनाथ गायकवाड  यांनी पत्नी व मुलीला होत असलेला त्रास पाहून स्वतःहून उलट्या करुन खाललेले अन्न बाहेर काढले. त्यामुळे आपल्याला विषबाधेचा त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 3 died due to food poisoning in mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.