पावसाचा धुमशान ! रायगडमधील 3 मच्छिमार बोटी बेपत्ता, भातशेतीचेही प्रचंड नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 03:00 PM2017-09-20T15:00:09+5:302017-09-20T15:02:04+5:30
मच्छिमारीकरीता अरबी समुद्रात गेलेल्या जिल्ह्यातील तीन बोटी बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
जयंत धुळप/रायगड, दि. 20 - मच्छिमारीकरीता अरबी समुद्रात गेलेल्या जिल्ह्यातील तीन बोटी बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. या तीन बेपत्ता बोटींमध्ये अलिबाग तालुक्यांतील रेवस मच्छिमार सोसायटीचे सदस्य किशोर शाम कोळी यांची ‘पौर्णिमाप्रसाद’ आणि करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य हरिश्चंद्र नाखवा यांची ‘मानसशिवालय’ व अन्य एका बोटीचा समावेश आहे.
मंगळवारी (19 सप्टेंबर ) रात्रभर पावसाने संपूर्ण रायगड जिल्ह्यास झोडपून काढले आहे. बुधवारी ( 20 सप्टेंबर ) सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात माथेरान येथे सर्वाधिक 362 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पावसाची नोंद
पनवेल-254
उरण-240
पेण-220
कजर्त-204
अलिबाग-118
खालापूर-153
म्हसळा-152.80
श्रीवर्धन-120
माणगांव-114
पोलादपूर-105
सुधागड-101
तळा-92
महाड-88
रोहा-62
मुरुड-60
गेल्या 24 तासांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उभ्या भात शेतीत पावसाचे पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी भातशेतीवरुन पाणी वाहून गेल्याने भातपिके आडवी होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.