कर्जतमधील महिलांना ३ लाखांचा गंडा, आरोपी मनीष लोकरसला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:06 AM2018-12-17T03:06:39+5:302018-12-17T03:06:58+5:30
महिला गटांची फसवणूक : आरोपी मनीष लोकरसला पोलीस कोठडी
कर्जत : वर्ल्ड ट्रस्ट थाय मनी कंपनीने कर्जतमधील महिलांना तब्बल २ लाख ९४ हजारांचा गंडा लावला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आल्यावर कंपनीमधील जयश्री कोपर्डेकर हिला पोलिसांनी आधी ताब्यात घेतले होते, मात्र या मागचा खरा सूत्रधार चेअरमन मनीष लोकरस याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कर्जतमधील प्रीती गुप्ता या डी. एन. आर. एस. या कंपनीत मार्केटिंगचे काम करत होत्या. त्यांच्या सोबत बदलापूर येथील प्रतिभा कार्लेकरसुद्धा काम करत होत्या. त्यांची ओळख झाली. प्रतिभा कार्लेकर यांनी कल्याण येथे राहणाऱ्या जयश्री कोपर्डेकर यांच्याशी प्रीती गुप्ता यांची ओळख करून दिली. १५ एप्रिल २०१८ रोजी या दोघी प्रीती गुप्ता यांच्या घरी आल्या.आमची वर्ल्ड ट्रस्ट थाय मनी कंपनी असून कंपनीमार्फत कागदाच्या पिशव्या बनविण्याकरिता माल पुरविणार आहोत, त्यानंतर मेणबत्ती, अगरबत्ती बनविण्याकरिता माल पुरविणार आहोत. त्याकरिता तुम्हाला २५ अथवा त्यापेक्षा जास्त महिलांचा गट तयार करावे लागतील. महिलांकडून प्रत्येकी ६५१ रु पये जमा करावयाचे असून ते रोख पैसे कंपनीकडे जमा करावे लागतील, असे सांगितले.
१०० छोट्या पिशव्या तयार केल्यानंतर त्यांचे ५० रु पये शेकडा कंपनी देणार व १०० मोठ्या पिशव्या बनविल्यानंतर ८० रु पये दराने कंपनी ग्रुपमधील महिलांना पैसे देईल, असे ठरले. तसेच कंपनीच्या नफ्यातील ४९ टक्के पैसे महिलांना दिले जातील, असेही सांगण्यात आले. शिवाय बाहेर गावातील गट तयार केले तर २ टक्के कंपनी फायदा करून देईल असे गुप्ता यांना सांगितले. ज्या महिलांना काम आवडले नाही तर पैसे लगेच परत केले जातील, कोपर्डेकर यांनी सांगितले.
च्कर्जतमध्ये असे महिलांचे १३ ग्रुप झाले. प्रत्येक ग्रुपमध्ये २५ हून अधिक महिला सदस्या होत्या. अशा सुमारे ३७५ महिलांचे गट तयार झाले. प्रत्येक महिलेने ६५१ रु पये कंपनीकडे जमा केले होते. त्यात ग्रुपच्या महिलांनी कागदी पिशव्या बनवून कंपनीकडे पाठवल्या त्याचा मोबदला सुद्धा आला नाही त्यामुळे गुप्ता यांनी कोपर्डेकर यांच्याशी आणि कंपनीचे अध्यक्ष मनीष लोकरस यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी टाळाटाळ केली.
च्फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कोपर्डेकर यांना आधी अटक केली होती, मात्र न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. त्यानंतर कंपनीचा चेअरमन मनीष लोकरस याला सांगलीतून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.