अलिबाग - स्वतंत्र भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग सायकल क्लबच्या संतोष तावडे, समीर म्हात्रे व मकरंद नाईक या तीन सायकलस्वारानी 'सायकल चालवा आरोग्य मिळवा' तसेच 'सायकल चालवा पर्यावरण वाचवा' असा संदेश देत अलिबाग ते गोवा असा ५७९ किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला या सायकल अभियान त्यांनी अलिबाग ते केळशी, केळशी ते गुहागर, गुहागर ते पावस, पावस ते कुणकेश्वर व अंतिमतः कुणकेश्वर ते कलंगुट असा प्रवास करून सदर अभियान सफल केले.
सदरचा सायकल प्रवास त्यांनी अलिबाग पासून गोव्यापर्यंत सागरी महामार्गाच्या घाट रस्त्याने केला. प्रवास सहा दिवसात पूर्ण करताना ४३ तास सायकल चालवत ६५७७ मीटर इतकी उंची गाठली. सायकल अभियानाच्या सुरुवातीला पोद्दार सर यश बसवराज व मिलिंद पाटील यांनी मुरुड पर्यंत सायकल चालवत सोबत केली त्यानंतरचा प्रवास मदतीला कोणतेही वाहन न घेता स्वबळावर पूर्ण केला. प्रवासात खराब रस्त्यामुळे एका सायकलचा टायर फाटल्याने तसेच छोटासा अपघात होऊन देखील जिद्दीने आलेल्या अडचणीवर मात करत प्रवास पूर्ण केला.
या दोन्ही अडचणीत स्थानिक नागरिक आणि दापोली सायकल क्लबचे सदस्य यांनी मोलाची मदत केली. रत्नागिरी, पावस व वेंगुर्ला येथे माजी सैनिक संघटना व भाकर सामाजिक संस्था यांनी सायकल वीरांचे फटाके लाऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मागील वर्षी देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने माझी वसुंधरा व रायगड जोडो अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ५५० किलोमीटरची रॅली काढण्यात आली होती.