उरणमध्ये डेंग्यूचे २० संशयित; डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:45 PM2019-11-20T23:45:58+5:302019-11-20T23:46:07+5:30
ताप, खोकल्याच्या रुग्णांतही वाढ
उरण : उरण परिसरात ताप, सर्दी, थंडी, खोकल्याबरोबरच डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे विविध विकारांच्या रुग्णात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उरणमध्ये सरकारी, खासगी व ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूचे जवळपास २० संशयित रुग्ण उपचार घेत आहेत.
उरण शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, थंडी, खोकल्याबरोबरच डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात उघडे नाले, गटारे आणि सांडपाणी यांच्यावर आरोग्य विभागाकडून नियमित औषध फवारणी केली जात नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या हवामानामुळे विविध विकारांच्या रुग्णात वाढ होत आहे. सध्या उरण परिसरात २५ पेक्षाही अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. काही डेंग्यूचे संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण विभाग आतापर्यंत डेंग्यूचे १६ रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली. उरण परिसरात ताप, सर्दी, थंडी, खोकला आदी विविध विकारांच्या रुग्णातही वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. शहर आणि ग्रामीण भागात डासांची पैदास होणार नाही याची आरोग्य विभागाकडून दक्षताही घेतली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाकडून संशयित ठिकाणी जाऊन डास प्रतिबंधक फवारणी आणि संशयित नागरिकांची आरोग्याची तपासणी केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक मनोज भद्रे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली.
उरण शहरात डेंग्यूचे तीन-चारच संशयित आढळले आहेत. मात्र नगरपरिषदेच्या हद्दीत डेंग्यूची साथ नाही. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, अद्याप मिळालेल्या आकडेवारीवरून तसे काही दिसून आलेले नाही.
- मनोज भद्रे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.