अलिबाग : रायगड जिल्ह्यातून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त जनावरांसाठी १०७ टन चारा व पेंढा पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे शेतात उतरून श्रमदान करून चारा कापण्यासाठी हातभार लावला. पशूसंवर्धन, महसूल अधिकारी, जिल्हा परिषद, सरपंच व ग्रामस्थांनी श्रमदानातून हिरवा चारा कापून भारे ट्रकद्वारे पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी रवाना केले.
सांगली, कोल्हापूर परिसरात आलेल्या पुरामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. कुटुंब, घरे उद्ध्वस्त झाली आहेत तर हजारो जनावरे मृत झाली आहेत. त्यामुळे तेथील जनतेच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिवंत जनावरांनाही काय खायला घालायचे याची चिंता शेतकऱ्यांना पडली होती. सांगली, कोल्हापूरमधील जनावरांना चारा पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत.महसूल, पशू विभागाकडून मदतअलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील माळरानावरील शेतात असलेला हिरवा चारा कापून ट्रकमध्ये भरण्यात आला. जिल्हाधिकारी सूर्यवंशी स्वत: शेतात उतरून चारा कापण्यास मदत करीत होते. पशू, महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचाºयांनीही चारा कापून भारा डोक्यावर घेऊन ट्रकमध्ये भरला. तर स्थानिक शेतकºयांनी स्वत:साठी एक भारा व दोन भारे पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी पाठविले आहेत.जिल्ह्यातून माणगाव १२ टन, अलिबाग ६० टन, पेण १५ टन, पोलादपूर आणि मुरुड प्रत्येकी १० टन असा एकूण १०७ टन चारा आणि पेंढा पूरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील जनावरांचा खाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.