नितीन भावे
खोपोली - झेनिथ धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या १५ पर्यटकांपैकी पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तीन पर्यटक वाहून गेलेे. त्यापैकी मेहेरबानू खान (४०) व रुबीना वेळेकर (४०) रा.विहारी, खोपोली या दोन महिलांचे मृतदेह एक किलोमीटर अंतरावर हाती लागले आहेत. तर आलमा खान (८) या मुलीचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
रायगड जिल्ह्यामध्ये २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला गेला होता.त्यातच गुलाब चक्रीवादळाने ही सर्वत्र थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. आज दुपारी सुमारास १५ पर्यटक झेनिथ धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी गेले होते.यामध्ये दोन पुरुष, पाच महिला आणि आठ लहान मुला-मुलींचा समावेश होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस व घाटमाथ्यावर खंडाळा ,लोणावळा येथे सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे धबधब्याला अचानक पाणी वाढले. त्याचा अंदाज या पर्यटकांना आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार ८ वर्षाची आलमा ही वाहून जाऊ लागली असता तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मेहर बानू व रुबीना या दोघीही वाहून गेल्या. दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह एक किलोमीटर अंतरावर सापडले.
झेनिथ धबधब्यावर पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर ,हनीफ कर्जीकर यांच्या नेतृत्वाखाली २० जणांनी राहिलेल्या १२ पर्यटकांची दोरखंडाच्या साह्याने सुखरूप सुटका केली. त्यानंतर तीन तास आलमा चा शोध सुरू होता. परंतु पावसाची संततधार, नदीला वाढलेले पाणी व अंधार यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून बुधवार पहाटेपासून शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती गुरुनाथ साटेलकर यांनी दिली.
पर्यटकांनी धबधब्यावर जाऊ नये - शिरीष पवार
गेले काही दिवस सुरू असलेली अतिवृष्टी, चक्रीवादळाचा इशारा या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये. तसेच खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांवर,धबधब्यांवर जाण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे.झेनिथ धबधब्यावर जाऊ नये अशा आशयाचे फलक ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यावर जाऊ नये व आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन खोपोलीचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी नागरिकांना केले आहे.