एसटी महामंडळाच्या पनवेल आगारात 30 टक्के उपस्थिती, कोरोनाचा एसटीला लाखोंचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:54 AM2021-05-12T08:54:50+5:302021-05-12T09:09:27+5:30
पनवेल बसस्थानक आगारातून अत्यावश्यक सेवेत दादर, कुर्ला, कल्याण अशा मोजक्याच मार्गांवर बसेस सुरू आहेत.
अरुणकुमार मेहत्रे -
कळंबोली : कोरोना संसर्गात सर्वाधिक फटका हा एसटी महामंडळाला बसला आहे. गतवर्षी पूर्णपणे सात महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारत असताना एप्रिल महिन्यात पुन्हा संचारबंदीसह लॉकडाऊन लागू करण्यात आला. अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी पनवेल आगारातून मोजक्याच बसेस धावत आहेत. शासकीय आदेशानुसार ३० टक्केच कर्मचारी कामावर बोलावले जात आहेत.
पनवेल बसस्थानक आगारातून अत्यावश्यक सेवेत दादर, कुर्ला, कल्याण अशा मोजक्याच मार्गांवर बसेस सुरू आहेत. लॉकडाऊन काळात अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे.
कोरोनाचा काळ आणि त्यात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर बसेस सुरू नसल्याने महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्य परिस्थितीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामे सुरू आहेत. मोजक्याच चालक-वाहकांची उपस्थिती आहे. सध्या पनवेल आगारातून १४ शेड्युल प्रमाणे बसेस चालत आहेत.
त्याकरिता २४ चालक - वाहक काम करीत आहेत. काही बसेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मेकॅनिकल, कामगारांना बोलवावे लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जास्तीची उपस्थिती न ठेवता गरज असेल तेवढे कर्मचारी उपस्थित राहत आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण राबविले जात आहे.
चालक- वाहक घरीच
शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर एसटीला अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले आहे. अत्यावश्यक सेवेला म्हणावा तितका प्रतिसाद नसल्याने अनेक चालक-वाहक घरीच आहेत. कोरोनाचे नियम पाळण्यात येत असल्याने इतर वेळी गजबजलेले पनवेल बसस्थानकात आजतागायत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
संचारबंदीमुळे बसला कमी प्रतिसाद आहे. सकाळी आणि संध्याकाळी थोडेफार प्रवासी मिळतात. पण, दुपारी बसेस रिकामीच जात आहे. अनेकदा प्रवासी नसल्याने बस फेऱ्या रद्द होतात. काम असले की बस चालवतो. फेरी रद्द झाल्यानंतर बस डेपोत थांबतो आहे. - चालक
शासनाचे कमी कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचे आदेश असल्याने मी घरीच राहतो आहे. माझ्या सहकाऱ्याने सुट्टी घेतल्यामुळे मी आज ड्युटीवर आलो आहे. बससेवा कमी असल्यामुळे वाहक कमीच लागत आहेत. - वाहक
शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यानुसार कर्मचारी वर्ग बोलाविण्यात येत आहे. तांत्रिकी विभाग आणि प्रशासकीय विभागातील ३० टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती आहे. अत्यावश्यक सेवेत लागणारे कर्मचारी काम करीत आहेत. सध्या संचारबंदीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे.
- विलास गावडे, आगार प्रमुख, पनवेल