सिकंदर अनवारे । लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या जमिनीचे संपादन होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला, तसेच गावाशेजारी राहणाऱ्या वस्तीतील घर मालकांना त्यांच्या इमारतीचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली असून, महाड तालुक्यातील वीर, दासगाव, वहूर अशा तीन गावांना तीन टप्प्यांत ३० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक खातेदाराच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. वारस नोंदी, मृतांची नोंद कमी करणे, परदेशात असलेले नागरिक व बँकेत खाते नसणे, अशा अनेक अडचणींमुळे जवळपास ५० टक्के पैसा शासनाच्या खात्यात पडून राहिला आहे. इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्याच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या टप्प्याच्या कामाची निविदा एल अॅण्ड टी या कंपनीने घेतली आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या गावांचे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तसेच गाव ठिकाणी असलेल्या वस्ती ठिकाणच्या इमारती संपादित करून पैसावाटपाला सुरुवात झाली आहे. यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. महाड तालुक्यातील वीर, दासगाव, वहूर, केंबुर्ली, नडगावतर्फे बिरवाडी, चांढवे खुर्द, राजेवाडी, कांबळे तर्फे महाड, महाड शहर, गांधारपाले, चांभारखिंड ही ११ गावे मुंबई-गोवा महामार्गालगत येत असून, या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच महामार्गालगत येणारी बांधकामे केंद्र सरकारने चौपदरीकरणासाठी संपादित करून त्या त्या जागा मालकांना पैशांचे वाटप सुरू केले आहे. पहिल्या टप्प्याचे वाटप महाड तालुक्यातील वीर या गावापासून सुरुवात क रण्यात आले. या गावात ८० जागा मालकांना नोटिशी बजावण्यात आल्या होत्या. या गावांसाठी केंद्र सरकारकडून १५ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात वहूर या गावात वाटप करण्यात आले. या गावामध्ये १२३ जागामालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तर गावासाठी २३ कोटी रुपये आले आहेत. मात्र, या गावामध्येदेखील १० कोटींचे वाटप झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात दासगावमध्ये वाटप करण्यात आले असून, या ठिकाणी ९० जागा मालकांना नोटिसी बजावण्यात आल्या होत्या, येथे १९.५० कोटींचे वाटप करण्यात आले. या तीन गावांसाठी ५७.५० कोटी रुपये वाटपासाठी आले असता ३० कोटींचे वाटप पूर्ण करण्यात महाड उपविभागीय कार्यालयाला यश आले असून काम पूर्ण करण्यात आले आहे.एवढे वाटप होत असताना हे तीन गाव मिळून जवळपास ४६ टक्के एवढी रक्कम वाटपची शिल्लक राहिली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अगर घर जात आहेत. अशा शेतकऱ्यांचे सात-बारा आणि मालकीविषयी कागदपत्रे यामध्ये त्रुटी असल्याने अगर अनेक व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने परदेशात असल्याने वाटपात अडथळा निर्माण झाला आहे.
भूसंपादनासाठी ३० कोटींचे वाटप
By admin | Published: June 29, 2017 2:56 AM