पोलादपूर येथे प्रसादातून ३0 जणांना विषबाधा
By admin | Published: May 19, 2017 03:57 AM2017-05-19T03:57:57+5:302017-05-19T03:57:57+5:30
तालुक्यातील पळचिल येथे मंगळवारी देवाची पांजीचा सार्वजनिक कार्यक्रम होता. यावेळी ग्रामस्थांनी प्रसाद खाल्ल्यानंतर सुमारे २४ तासांनंतर ग्रामस्थांना चक्कर, उलटी
- लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : तालुक्यातील पळचिल येथे मंगळवारी देवाची पांजीचा सार्वजनिक कार्यक्रम होता. यावेळी ग्रामस्थांनी प्रसाद खाल्ल्यानंतर सुमारे २४ तासांनंतर ग्रामस्थांना चक्कर, उलटी, जुलाब, ताप आणि पोटदुखी सुरू झाल्याने पोलादपूर ग्रामीणरुग्णालयात बुधवारी सायंकाळी दाखल करण्यात आले.
तपासणीअंती डॉक्टरांनी सार्वजनिक जेवणातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. मात्र मंगळवारी शिजविण्यात आलेल्या अन्नाचा नमुना उपलब्ध न झाल्याने विषबाधा अन्नातून की पाण्यातून झाली, याबाबत डॉक्टरही संभ्रमात आहेत. रुग्णांची प्रकृती सुधारत असून उपचारानंतर गुरुवार रोजी सकाळी काहींना घरी पाठविण्यात आले.
विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये वैशाली जाधव (४५), बाळू जाधव (७५), सुनिता जाधव (४५), अर्जुन जाधव (८०), जनाबाई जाधव (७५), जनाबाई सकपाळ (६५), लक्ष्मी जाधव (६५) वैष्णवी (२५), आकाश जाधव (१९), आदिती शेलार (१०), जीत जाधव (५), ओम मोरे (१३), सुनील जाधव (४६), सोनाली शेलार (१२), महेश मोरे (५२), काशिनाथ मोरे (२०), सावित्री जाधव (७०), संदेश जाधव (२५), गंगाबाई जाधव (६५), हिराबाई जाधव (४५), तुकाराम जाधव (५४), सोनान जाधव (५०), सुरेखा जाधव, सूरज मोरे (२३), नरेश जाधव (२१), सुनिता जाधव (४८) आदी सुमारे ३० जणांचा समावेश आहे. त्यापैकी १५ ते २० रुग्णांना घरी पाठविण्यात आले. तर काही रुग्णांवर अद्याप उपचार सुरू असून गुरुवारी सकाळी पुन्हा तिघांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरून रुग्ण वाढत आहेत.
पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही यावेळी उपलब्ध झाली नाही. तसेच आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली असल्याची माहिती मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी दिली.
आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असून पुरेसा औषध साठा नाही, तसेच सुविधाही उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधे मागवावी लागल्याची
माहिती ग्रामस्थ निवृत्ती जाधव यांनी दिली.
पाण्याचे नमुने तपासण्याचे राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर आरोग्य विभागाला दिले आदेश
तालुक्यातील पळचिल येथील सुमारे ३० जणांना अन्न व पाण्यातून विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी गुरुवार रोजी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात भेट देवून रुग्णांची विचारपूस केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील व डॉ. मधू चव्हाण यांच्याशी चर्चा करून पुन्हा तालुक्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पाण्याचे नमुने तत्काळ तपासून घ्यावेत असे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. यावेळी सोबत तालुका प्रमुख नीलेश अहिरे, माजी सभापती नारायण अहिरे, महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, निवृत्ती जाधव, माजी सभापती सहदेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलादपूर ग्रामीण रुग्णालय पितळवाडी व पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्नशील असून येत्या काही दिवसात रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, अशी ग्वाही कळंबे यांनी दिली. पळचिल प्रा. आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे पत्राशेड व स्टाफ कॉर्टरसाठी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून वर्कआॅर्डर मिळाली आहे. या कामाची लवकरच पूर्तता करून पळचिल प्रा. आ. केंद्राच्या नूतन इमारतीचे लवकरच उद्घाटन करून सर्व सोयी-सुविधायुक्त असे हे रुग्णालय लवकरच चालू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कळंबे यांनी सांगितले.
- रुग्णाची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या उलटीचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यामुळे विषबाधा नेमकी कशातून झाली, हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे यावेळी डॉ. सोनावणे यांनी सांगितले. गुरुवार रोजी सकाळी वैद्यकीय अधीक्षक पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देवून घटनेचा आढावा घेवून उपचार सुरू केले आहेत.