समाज माध्यमांमुळे रायगडमध्ये ३० टक्के घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:11 AM2020-06-18T01:11:01+5:302020-06-18T01:11:24+5:30
कौटुंबिक कलहास मोबाइल कारणीभूत : धक्कादायक माहिती
- निखिल म्हात्रे
अलिबाग : सध्याच्या युगात मोबाइल, इंटरनेट आणि समाज माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. मात्र, सोशल मीडियामुळेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात समाज माध्यमाच्या वादातून ३० टक्के घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समाज माध्यमांसारख्या गोष्टी स्वस्त आणि आवाक्यात आल्यानंतर वापरकर्ते अक्षरश: त्यांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे मोबाइल हेच आपले जग अशा मानसिकतेत असलेल्या नागरिकांमध्ये कौटुंबिक वाद वाढत चालले आहेत. अशाच वादातून ३० टक्के घटस्फोेट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरापासून दूर असताना कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी फायदेशीर ठरणारा मोबाइल अनेकांना कुटुंबापासून दूर नेत आहे. अनेक जणघरात कुटुंबासमवेत असताना तासन्तास मोबाइलवर घालविताना आढळून येतात. यामुळे घराच्यांसोबत आपुलकीचा संवादच होत नसल्याचे दिसून येते.
व्हॉट्स अॅप, फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे पती-पत्नींमध्येही दुरावा वाढत चालला आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण व्हॉट्स अॅपवरील चॅटिंग, कॉल रेकॉर्ड, छायाचित्रे आदी पुरावे गोळा करेपर्यंत पोहोचते आणि त्यातूनच गंभीर गुन्ह्याची पातळी गाठली जाते. अशी अनेक प्रकरणे निवाड्यासाठी येत असतात. महिला आणि बालकल्याण विभागाच्या सखी विभाग व कौटुंबिक न्यायालयाद्वारे वाद मिटविण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे कौटुंबिक कलहात समेट करणे अत्यावश्यक होत असल्याचे महिला विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तरु ण दाम्पत्यांमध्ये संशयी वृत्ती वाढली आहे. याला समाज माध्यमांमुळे खतपाणी मिळत आहे. पती-पत्नीत वाद निर्माण होत आहेत. यात मोबाइलचा अति वापर हा कळीचा मुद्दा ठरत आहे. मोबाइलचा अति वापर टाळण्यासाठी नव्या पिढीला समुपदेशन करणे गरजेचे आहे. - अॅड. निहा राऊत
पती-पत्नीमधील विश्वासाचे नाते हरवत चालले आहे. मोबाइलच्या साहाय्याने एकमेकांविरोधात पुरावे शोधले जातात. समुपदेशानंतरही खदखद असते. कौटुंबिक कलहात ३० टक्के वादाला सध्या मोबाइल कारणीभूत आहे. हे वाद टाळण्यासाठी पती-पत्नीमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे.
- क्र ांती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक
(अतिरिक्त कार्यभार महिला विभाग)