भार्इंदर : पालिकेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार सफाईचे काम करतात. यापैकी ३५० कामगारांना कामावरुन कमी करण्याचा ठराव १९ मार्चच्या महासभेत मंजूर झाला आहे. त्यानुसार बुधवारी वृक्ष प्राधिकरणातील ५० कामगारांना कामावरून काढले. तर उर्वरित ३०० सफाई कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्यात येणार आहे. आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला.आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार प्रभाग समितीनुसार कामगारांना कमी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने २८ नोव्हेंबर २०१५ मध्ये काढलेल्या किमान वेतन आदेशानुसार प्रशासनाकडे श्रमजीवी संघटनेने किमान वेतनासाठी पाठपुरावा सुरू केला होता. कामगारांची मागण्यांवर प्रशासन केवळ आश्वासने देत असल्याचे पाहून संतापलेल्या कामगारांनी आंदोलने छेडले. वेतनाच्या निर्णयासाठी तत्कालिन महासभेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्यास मान्यता दिली. सरकारी आदेश असतानाही प्रशासन वेळकाढूपणा करत असल्यामुळे अखेर कामगारांनी सफाईचे काम थांबविले. किमान वेतन देण्याचा निर्णय होत असतानाही कामगारांनी शहराला वेठीस धरल्याचा राग सत्ताधाऱ्यांच्या मनात खदखदत होता. अखेर तो १९ मार्चच्या महासभेत उफाळून आला. सत्ताधाऱ्यांनी आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी ३५० कंत्राटी सफाई कामगारांनाच कमी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार आयुक्तांनी पाच एप्रिलला आदेश काढून सुरुवातीला वृक्ष प्राधिकरण विभागातील ५० कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आले. त्यानंतर प्रभाग समितीनुसार ३०० कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. यात प्रभाग समिती एकमधील ७७, दोनमधील ७८, तीनमधील ९२ व चारमधील ५३ कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. हे सर्व कामगार विविध कामगार संघटनेचे सदस्य असून नेमक्या कोणत्या कामगारांना कमी करणार, याबाबत कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)
३०० सफाई कामगारांवर संक्रांत
By admin | Published: April 11, 2016 1:23 AM