मधुकर ठाकूर
उरण: जेएनपीएने नव्याने उभारलेल्या ३१४ खर्चाच्या ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टी सर्वाधिक बोली लावलेल्या व यशस्वी ठरलेल्या जेएसडब्ल्यू इन्फ्रा स्ट्रक्चरल लिमिटेड कंपनीला देण्यावर मंगळवारी (५) झालेल्या बोर्ड ऑफ ट्र्स्टींच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.जेएनपीएच्या मालकीची ही अखेरची जेट्टीही पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी देण्यात आली आहे.
जेएनपीएची बंदरात ३०० मीटर लांबीच्या सध्याच्या एसबी -०२ व एसबी- ०३ या दोन्ही बर्थ बीपीसीएल, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या. या जुन्या जेट्टीच्या दोन्ही बाजूला बर्थिंगची सोय असल्याने दोन्ही बर्थवर पीओएल, एलपीजी, ईडीबल ऑईल, मोलॅशिस आणि इतर अनेक प्रकारच्या केमिकल जहाजांची वाहतूक केली जात आहे. वाढत्या तरल पदार्थांच्या हाताळणीसाठी सध्याचे लिक्विड बल्क टर्मिनल अपुरे पडत असल्याने जहाजांसाठी प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे आयात व्यापाऱ्यांना नाहक अतिरिक्त वेळ, पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
जुन्या जेटीच्या दोन्ही बाजूला २५००० ते ७०००० डीडब्ल्युटी ( डेडवेट टनेज) क्षमतेपर्यतची जहाजे एकाच वेळी हाताळण्याची सुविधा या जेट्टीला लागुन असलेल्या दुहेरी बर्थमध्ये आहे.जुन्या केमिकल जेट्टीची क्षमता ६.५ मिलियन टन (एमटीपीए) इतकी आहे. लिक्वीड कार्गो जेट्टीला जोडूनच अतिरिक्त आणखी जेट्टी ४६५ मीटर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टीमुळे केमिकल वाहतुकीची क्षमता आणखी ४.५ मेट्रिक टनांपर्यंत म्हणजेच ११ मिलियन टनांपर्यंत (एमटीपीए) म्हणजे दुपटीने वाढली आहे. त्यासाठी ३१४ कोटी रुपये खर्चही करण्यात आले आहेत. ही ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टी पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी जेएनपीएने निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत सात कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
कंपनीचे नाव दर प्रती मेट्रिक टन १.जेएसडब्ल्यू इन्फ्रा स्ट्रक्चरल लिमिटेड-- २५२/रुपये२.आयएमसी लिमिटेड--------------------- १५५/रुपये३.भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड-- १०८/रुपये४.अम्मा लाईन्स प्रा.लि/बीओएमएस प्रा.लि-९०/रुपये५.जेएम बॉक्स पोर्ट ॲण्ड लॉजिस्टिक लि.-- ७६/रुपये६.गणेश बॅन्जो प्लास्ट लि.सीव्हीपी इन्फ्रा प्रोजेक्ट-- ७४/रुपये ७.अर्गस् लॉजिस्टिक लिमिटेड-- ६४/रुपये
या सात कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू इन्फ्रा स्ट्रक्चरल लिमिटेडची बोली सर्वात मोठ्या रॉयल्टी देणारी ठरली आहे. यशस्वी ठरलेल्या कंपनी ३० वर्षांसाठी पीपीपी देण्यावर मंगळवारच्या (५) बोर्ड ऑफ ट्र्स्टींच्या बैठकीत मंजुरी देऊन शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांनी दिली.