वादळामुळे ३२ टक्के बागायत क्षेत्र बाधित; मुरूडमध्ये ७९४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:04 AM2020-09-08T00:04:01+5:302020-09-08T00:04:12+5:30
नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट
मुरूड : निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील २५०३ हेक्टर बागायत क्षेत्रापैकी ७९४ हेक्टर भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याने मुरूड तालुक्यातील नारळ, सुपारी, आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकसानीच्या मानाने शासनाने केलेली मदत कमीच असल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट दिसत आहे.
नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट पाहावी लागणार आहे. उंच माडाची झाडे एकावर एक कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नारळाचे बहुतांशी झाप पडल्याने फळधारणा होण्यासाठी झापांची जाळी तयार होईपर्यंत थांबावे लागणार आहे. माडी व्यवसाय करणाऱ्यांवरदेखील संक्रांत आली असून दहापैकी २ ते ३ झाडे माडी काढण्यायोग्य राहिली आहेत. माडी काढताना आधारासाठी माडावर पुरेसे झाप नसतील तर माडी निघत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातील कित्ते भंडारी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा माडीचा असून वेगाने सुटलेल्या वाºयाने माडाचे झाप उडून गेल्याने झाड बोडके झाले व परिणामत: या झाडांनी आता माडी देणे बंद केल्याने या भागात माडीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे निसर्ग चक्रीवादळामुळे नारळ व सुपारीची अनेक झाडे पडल्याने या भागात नारळांचा तुटवडा निर्माण झाला असून, चढ्या किमतीने आता नारळांची विक्री होताना दिसत आहे. तर सुपारीचीसुद्धा अनेक झाडे पडल्याने सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे.
२० टक्के आंबा बागायत लागवड ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने या बागांचे मोठे नुकसान झाले. तौलनिकदृष्ट्या सुपारीचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद आहे. नवीन बागायत तयार व्हायला किमान १० वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे प्रशासकीय पातळीवर केले. मात्र आंब्याला हेक्टरी ५० हजार, नारळास प्रति झाडास २५० रु पये तर सुपारीस ५० रु पये इतकी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. २५९० शेतकºयांना अनुदान स्वरूपात वाटप करण्यात आले. खरे पाहता आंब्यापासून सरासरी १० हजार, नारळापासून २ हजार तर सुपारीपासून १ हजार रु. वार्षिक उत्पन्न मिळते. बागायतदारांच्या एकूण क्षेत्रापैकी ३२ टक्के क्षेत्र चक्रीवादळामुळे बाधित झाले असून बळीराजाला नवीन लागवड केल्यानंतर किमान १० वर्षे उत्पन्न मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जाते.
सुपारीच्या रोपांची टंचाई
च्कोकणात अत्यल्प भूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रति गुंठा १२ ते १३ सुपारीची लागवड केली जाते. सुपारी पिकाचे वादळात अतोनात नुकसान झाले. नवीन लागवडीसाठी साहजिकच धावाधाव सुरू झाली. च्जिल्ह्यातील वेश्वी, आवास, रोहा व श्रीवर्धन या शासकीय रोपवाटिकांमध्ये रोपांचा तुटवडा आल्याने कृषी खात्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुपारीची रोपे मागवावी लागली. रोपे विनामूल्य असली तरी वाहतूक खर्चापोटी प्रति रोपास ८ रुपये शेतकºयांना चुकवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
एकूण लागवड क्षेत्र नुकसान
आंबा १५९० हेक्टर ६२९ हेक्टर
नारळ ४३५ ७८
सुपारी ४१६ १४२
इतर पिके ६२ ४५