जिल्ह्यात ६२ वर्षांत ३२ अपक्ष उमेदवारांनी लढवली निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:09 AM2019-04-08T00:09:53+5:302019-04-08T00:10:05+5:30
रायगड मतदारसंघ : १९७१ सालापासून अपक्ष लढवण्याची परंपरा
- आविष्कार देसाई
अलिबाग : निवडणुकीत जिंकून येण्याची प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते. मात्र, विजयी हा एकच उमेदवार होतो. काहींना निवडणूक लढवण्याची ऊर्मी असते, तर काहींना राजकीय पक्ष तिकीट नाकारतात म्हणून ते अपक्ष लढतात. पूर्वीचा कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदार संघात १९५२ ते २०१४ सालापर्यंत एकूण ३२ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. १९७१ सालापासून अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवण्याची परंपरा सुरू झाली होती. १९८४ साली काँग्रेससोबत फारकत घेतलेले बॅ.ए.आर.अंतुले हे एकमेव अपक्ष उमेदवार आहेत. ज्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चारीमुंड्या चित करत त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती.
पूर्वी एका विचारधारेसाठी अथवा काही राजकीय डावपेचांसाठी अपक्षांनी निवडणूक लढल्याचा इतिहास आहे. १९५२ साली कुलाबा लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि शेकाप हे दोनच प्रमुख राजकीय पक्ष होते. १९५७, १९६२ सालापर्यंत हीच परंपरा कायम होती. मात्र, १९६७ साली काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी जनसंघाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.
१९७१ साली अंबाजी तुकाराम पाटील यांनी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर काँग्रेसचे शंकर सावंत, शेकापचे दत्तात्रेय नारायण पाटील या प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान होेते. त्यानंतर १९७७ साली शेकाप आणि काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती. १९८० सालीच्या लोकसभा निवडणुकीत रतिलाल लल्लुदास शहा यांच्या रूपाने पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार लाभला. त्या वेळी काँग्रेस, शेकाप आणि जनता पार्टी या उमेदवाराचे आव्हान होते. १९८४ साली काँग्रेसचे बॅ.ए.आर. अंतुले यांचे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत पटले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी कृष्णा गायकवाड, विलास तुपे हे अपक्ष तर काँग्रेसकडून अंबाजी पाटील आणि शेकापचे दिनकर पाटील निवडणूक लढले होते. त्यामध्ये अपक्ष असणाऱ्या बॅ.ए.आर.अंतुले यांनी सर्वच उमेदवारांना धूळ चारली होती. बॅ.अंतुले हे निवडून आलेले एकमेव अपक्ष उमेदवार ठरले होते. त्यांच्यानंतर कोणत्याच अपक्षाला निवडणूक जिंकता आलेली नाही. बॅ.अंतुले यांची राजकीय ताकद होती हे काही वेगळे सांगायची गरज नाही.
१९८९ साली विश्वनाथ बाप्पये यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर १९९१ साली सहा अपक्षांनी आपले राजकीय नशीब आजमावले होते. १९९६ साली तर अपक्ष उमेदवारांनी चांगलीच कमाल केली. तब्बल १२ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून प्रतिस्पर्धी उमेदवारांना चक्रावून सोडले होते. १९९८ साली एक, १९९९ साली दोन, २००४ साली एकच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २००९ साली नव्याने अस्तित्वात आलेल्या रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अॅड. प्रवीण मधुकर ठाकूर, डॉ.सिद्धार्थ पाटील, सुनील नाईक असे तीन अपक्ष उमेदवार होते.
यंदा १२ अपक्ष रिंगणात
च्२०१९ सालच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल १२ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
च्८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात त्यावरच अपक्ष उमेदवारांची संख्या कळणार आहे.