नेरळ : कर्जत रेल्वे पोलिसांची तत्परता आणि प्रामाणिकपणामुळे प्रवाशाचे ट्रेनमध्ये विसरलेले ३२,६०० रु पये परत मिळाल्याची घटना कर्जतमध्ये घडली. उल्हासनगर येथे राहणारे राकेश कुकरेजा हे मुंबई-खोपोली ट्रेनने प्रवास करत होते. उल्हासनगर स्थानक येताच ते घाईगडबडीत उतरले. या वेळी त्यांची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग ते गाडीतच विसरले. ही बाब लक्षात येताच त्यांनी स्टेशन मास्तरांशी संपर्क साधला. राकेश कुकरेजा यांनी, आपले सुमारे २५ हजार रुपये आणि कागदपत्रे असलेली बॅग ट्रेनमध्ये विसरल्याचे सांगितले.
यानंतर कर्जत येथील आरपीएफचे प्रभारी निरीक्षक व्ही.एन. सिंग यांनी तत्परता दाखविली. पोलीस शिपाई एन. एस. पाटील यांनी तपास करून बॅग ताब्यात घेतली. कुकरेजा यांनी सांगितलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम बॅगेत होती. कर्जत आरपीएफने ३२,६०० रुपये आणि कागदपत्रे असलेली बॅग कुकरेजा यांना परत केली. काही दिवसांपूर्वी खोपोलीतील एका महिलेचे हरवलेले दहा हजार रु पये देखील कर्जत रेल्वे पोलिसांनी परत केले होते. पोलिसांविषयी विविध स्वरूपाच्या तक्रारी पुढे येत असताना कर्जत रेल्वे पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे व तप्तरतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.