- आविष्कार देसाईअलिबाग : महिलांच्या सुरक्षिततेबाबत समाजामध्ये कशी जागरूकता आली आहे. यासाठी समाजमाध्यमांचे दाखलेही दिले जातात; परंतु आजही महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसावी, अशी सुदृढ परिस्थिती सरकार, प्रशासन आणि समाज निर्माण करू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरामध्ये तब्बल ३२० महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १२७ विनयभंगाच्या, तर ६४ लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश असल्याचे दिसून येते.रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला, मुलींचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये तब्बल ३२० घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवून अपहरण अथवा पळवून नेणे, अशा घटनांमध्ये प्रामुख्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातील जमेची बाजू म्हणजे ३२० पैकी २७२ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरणाबरोबरच शहरीकरणामध्ये वाढ होत आहे. समाजामधीलच काही घटक अपप्रवृत्ती करण्याकडे वळत आहेत. महिलांना न्याय मिळावा, त्यांना समाजामध्ये बरोबरीचे स्थान मिळावे, यासाठी समाजसुधारकांनी विविध ट्रेंड समाजामध्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या बाजूने विविध कायदेही निर्माण करण्यात आले आहेत. महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून आजही पाहिले जात आहे. महिलांच्या बाबतीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांकडे पाहिल्यावर गुन्हेगारांचे ‘मोटिव्ह’ हे महिलांकडून पैसा आणि महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहणे हेच असल्याचे सहज दिसून येते. यावर उपाययोजना म्हणून समाजातील अपप्रवृत्तीची मानसिकता बदलताना महिलांनीही आता सक्षम होण्याची गरज आहे, असे रिसर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट या संस्थेचे प्रमुख डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले.महिलांवरील अत्याचाराबाबत पोलीस यंत्रणाही सक्षम झाली आहे. अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर महिला आधी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. मात्र, निर्भयासारख्या घटनांनंतर महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. महिलांनी अन्याय सहन करू नये, त्यांना कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे तक्रारी नोंदवण्यासाठी विविध पर्यायाचा वापर करावा, अन्याय सहन न करता गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले.>महिलांना तक्रार देताना संकोच वाटू नये म्हणून महिला पोलीसमहिलांना अत्याचाराबाबतची तक्रार देताना संकोच वाटतो, यासाठी पोलीस दलामध्ये महिला अधिकारी अथवा महिला पोलीस शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अत्याचार झालेल्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी ही महिला पोलीस अधिकारी यांच्यावरच सोपवण्यात आली आहे. जेणेकरून तपासामध्ये संवेदनशीलता टिकून राहील.महिलांना तक्रार करण्यासाठी विविध पर्याय खुले आहेत. थेट पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस महासंचालकांकडे थेट आॅनलाइन तक्रार करू शकतात. याची जबाबदारी संबंधित पोलीस अधीक्षक यांच्यावर असते आणि त्याचे मॉनेटरिंग हे पोलीस महासंचालक करतात. नोकरी / कॉर्पोरेट सेक्टरमधील महिलांसाठी राज्यामध्ये ‘बडी अॅप’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामध्ये व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यात येतो. या अॅपचा वापर करून अत्याचार झालेल्या महिला तक्रार नोंदवू शकतात, त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा करणे सोपे जाते.गेल्या वर्षभरात हुंड्यासाठी पती तसेच सासरच्या व्यक्तींकडून छळ केल्याच्या आठ तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. लग्नाचे आमिष दाखवून महिला, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना पळवून नेण्याच्या ९३ तक्र ारी केल्या आहेत. जिल्ह्यात मागील वर्षभरात १२७ विनयभंगाच्या तर ६४ लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
वर्षभरामध्ये अत्याचाराच्या ३२० घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:54 PM