रायगड जिल्ह्यात ३२४ प्रकरणे निकाली
By Admin | Published: February 16, 2017 02:09 AM2017-02-16T02:09:40+5:302017-02-16T02:09:40+5:30
राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवारी येथील रायगड
अलिबाग : राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवारी येथील रायगड जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३२४ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये एकूण ५ कोटी ३ लाख २५ हजार ७१ रुपयांची नुकसानभरपाई मान्य करण्यात आली आहे.
लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयातील एकूण २ हजार ७९ प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३२४ प्रकरणे निकाली निघाली. बँकांची ४ हजार ३७५ वादपूर्व प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी १७३ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये ३१ लाख ७ हजार ७९२ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. कामकाज सुरू असताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगडचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर यांनी प्रत्येक कक्षावर भेट देऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले.
रायगड जिल्हा न्यायालय आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या वेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगडचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर, जिल्हा न्यायाधीश-१ के. आर. पेटकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एल. डी. हुली, रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकूर, सचिव अॅड. ए. डी. पाटील, न्यायिक अधिकारी, मेट्रो सेंटर पनवेलचे भूसंपादन अधिकारी तसेच वकील वर्ग व बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(विशेष प्रतिनिधी)