रायगड जिल्ह्यात वर्षभरात 34 गरोदर मातांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:35 AM2021-03-13T00:35:36+5:302021-03-13T00:36:01+5:30
दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश; अतिरक्तस्राव, रक्तदाब कारण
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्हा रुग्णालयात गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे. वर्षभरात रेफर केलेल्या केससह ३४ मातांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज ७ ते ९ माता प्रसूतीसाठी येतात. या मातांची प्रसूती होईपर्यंत परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागरूक रहावे लागते. प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव किंवा वाढत जाणारा रक्तदाब हे बऱ्याचदा माता दगावण्याचे महत्त्वाचे कारण असते. माता मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असते. प्रसूती दरम्यान रुग्णालयात आलेल्या मातेची काळजी घेतली जाते. औषधोपचाराबरोबरच २४ तास तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम सतर्क असते. त्यामुळे मातेची प्रकृती अचानक गंभीर झाली तरी योग्य व तातडीच्या उपचारामुळे माता दगावण्याचे प्रमाण जिल्हा रुग्णालयात कमी झाले आहे.
कोरोनामुळे दोन महिलांचे प्राण अचानक रक्तदाब वाढल्यामुळे गेले होते. कोरोना काळात मातांना सुरक्षित ठेवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि डाॅक्टरांनी चांगले प्रयत्न केले. त्यामुळे माता दगावण्याचे प्रमाण अटोक्यात आणण्यात यश आले आहे. रायगडमध्ये ऑक्टोबर महिन्यांत सर्वाधिक कहर केला होता. त्या महिन्यात रोज २० ते २५ जणांचा मृत्यू होत होता .यावेळी सर्वाधिका धोका हा गरोदर मातांना होता. जिल्हा रुग्णालयात या मातांसाठी स्वतंत्र्य वाॅर्ड होता. या वाॅर्डमध्ये बाहेरील कोणालाही सोडले जात नव्हते. त्यामुळे मातांना संसर्ग झाला नाही. माता मृत्यूसाठी रक्तदाब सर्वांत मोठे कारण -मातेची प्रसूती होण्यापूर्वी तिचा रक्तदाब हा स्थिर असावा लागतो. अनेकदा भीतीपोटी रक्तदाब वाढतो. काही वेळा योग्य उपचार न मिळाल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे माता व बाळ दगावण्याची शक्यता असते.
महिना एकूण प्रसूती सीझर नॉर्मल
जानेवारी २९७५ ७२० २२५५ ०१
फेब्रुवारी २७७४ ६३० २१४४ ००
मार्च २७१९ ६६९ २०५० ०१
एप्रिल ३५८२ ६५२ २९३० ०५
मे ३१९२ ९८८ २२०४ ०५
जून ३३५७ ७५४ २६०३ ०१
जुलै ३४५८ ९५६ २५०२ ०३
ऑगस्ट ३७९४ ११२२ २६७२ ०४
सप्टेंबर ४०२१ १२६५ २७५६ ०२
ऑक्टोबर ३४८६ ९४५ २५४१ ०८
नोव्हेंबर २७७१ १०४३ १७२८ ०४
डिसेंबर ४७१० २३७२ २३३८ ००