पेणच्या मूर्तिकारांनी साकारले ४०० कोटींचे ३५ लाख बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 08:22 AM2023-08-11T08:22:03+5:302023-08-11T08:22:24+5:30
कोरोना काळात गणेशमूर्तीचा व्यवसाय डबघाईला आला होता. यावर्षी मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र, खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे.
- दत्ता म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
पेण : कलानिर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या गणेशमूर्ती निर्माण नगरीत आता गणेशभक्तांची वर्दळ वाढली आहे. सध्या पेण शहर आणि कलानगरी हमरापूर, जोहे, कळवे, तांबडशेत या चार गावांत घरोघरी गणेशमूर्ती रंगकामाची लगबग सुरू झाली आहे. पेण तालुक्यात यावर्षी ३५ लाख इकोफ्रेंडली
आणि पीओपीच्या गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे. तब्बल ४०० कोटी रुपये व्यवसायाची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पेण शहर आणि कलानिर्मिती केंद्र असलेल्या हमरापूर जोहे विभागातील १,२८० कार्यशाळांमध्ये मूर्तिकार कुशल आणि अकुशल असे ६,००० कामगार दिवस-रात्र गणेशमूर्ती रंगकामाचे काम करीत आहेत. पेण शहरात ४५० ते ५०० कार्यशाळांमधून १२ ते १५ लाख गणेशमूर्ती निर्माण केल्या जातात. कलानगरी हमरापूर, जोहे, तांबडशेत, कळवे विभागात ९०० कार्यशाळांमधून जवळजवळ १८ लाख गणेशमूर्ती निर्माण केल्या जातात.
कोरोना काळात गणेशमूर्तीचा व्यवसाय डबघाईला आला होता. यावर्षी मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र, खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे.
मूर्तीत २०% वाढ अपेक्षित
महिनाभरात बाप्पाचे आगमन होणार असल्याने गणेशभक्तांना सुबक गणेशमूर्ती रंगकाम ज्वेलरी सजावट करून देण्यात कारागीर युद्धपातळीवर काम करीत आहेत. शाडू माती, रंगाचे दर, सजावटीचे साहित्य महागल्याने आणि वाहतूक वितरण यामुळे यावर्षी गणेशमूर्ती किमतीत १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे.
मागील दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. आता २०२३ वर्षात हा उत्सव मोठा आनंदाचा असल्याने दरवर्षीप्रमाणे २० ते २५ हजार गणेशमूर्ती परदेशातील आशिया, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, ऑस्टेलिया, कॅनडा व आखाती देशात रवाना झाल्या आहेत.
- नीलेश समेळ,
युवा मूर्तिकार, पेण