पनवेल : खारघर शहरात झपाट्याने वाढत चाललेल्या अनधिकृत झोपड्यांवर सिडको, पालिका, तसेच खारघर पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३५० पेक्षा जास्त झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.
खारघर शहर हे सिडकोने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उभारलेले शहर आहे. मात्र, नजीकच्या काळात शहरात मोठ्या पद्धतीने अनधिकृत झोपडपट्टी वाढत चालली आहे. या झोपड्यांमध्ये अवैध उद्योगधंदे केले जात असल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. शहरातील पदपथ, मोकळी जागा, तसेच रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी वाढत चालल्याने शुक्रवारी, ४ डिसेंबर रोजी सिडको, पालिका, तसेच पोलिसांच्या माध्यमातून मोहीम राबवत ३५० पेक्षा जास्त झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. जेसीबीच्या साहाय्याने या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. सिडकोचे अतिक्रमण विभागाचे विशाल ढगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
शहरात एकही अनधिकृत झोपडपट्टी उभी राहणार नाही, याबाबत खारघर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून खबरदारी घेतली जाईल, असे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी स्पष्ट केले. कोविड काळात सिडकोची कारवाई थंडावल्याने शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या वाढल्या होत्या. या अनधिकृत झोपड्यांवर सिडको, तसेच पालिका प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे.