३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात, किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 06:26 AM2023-06-03T06:26:17+5:302023-06-03T06:26:50+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील सुराज्य निर्माण केले जाईल : एकनाथ शिंदे
महाड : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर शुक्रवारी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा झाला. शासनाच्या वतीने गेल्या महिनाभर या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. सनई-चौघड्याचे मंगलमय सूर, ढोलताशांचा गजर आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात हा सोहळा झाला. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर आपला शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी केला. या शिवराज्याभिषेकाचा वर्धापन दिन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. यावर्षी या सोहळ्याचे भव्य आयोजन शासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. रायगडावरील राजदरबारात असलेली मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजविण्यात आली होती. १ आणि २ जून असे दोन दिवस गडावर विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषात झाले. यामुळे रायगडावर मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
गडावरील विविध देवी-देवतांची विधिवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच शिवराज्याभिषेक सोहळा सुरू झाला. विकास गोगावले यांनी सपत्नीक शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून नंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेक केला. सूर्योदयावेळीचे आल्हाददायक वातावरण आणि शिवप्रेमींमधील अलोट उत्साह यामुळे रायगडावर वेगळेच उल्हसित वातावरण होते. शिवकालीन पारंपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, फडकणारे भगवे ध्वज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि ढोलताशे, तुतारींचे स्वर यांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खा. सुनील तटकरे, खा. श्रीकांत शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, आ. बच्चू कडू, आ. भरत गोगावले यांच्यासह खा. उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होताच संपूर्ण रायगडावर एकच जल्लोष झाला. ढोलताशांच्या गजरात हजारो शिवभक्तांनी फेर धरला. भगवे झेंडे, तलवारी, भाले आकाशाच्या दिशेने उंचावत शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला. यावेळी सांस्कृतिक विभागामार्फत काढलेल्या शिवराय गॅझेटचे प्रकाशनदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय किल्ले रायगडावर काम करीत असलेल्या गाइड्सना खा. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या विमाकवचचे वितरण करण्यात आले.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पोलिस मानवंदना
शिवराज्याभिषेक सुरू असतानाच अवकाशातून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी प्रथमच पोलिस मानवंदनादेखील देण्यात आली.
४० किलो चांदीची मूर्ती
या सोहळ्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ४० किलो चांदीची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समितीकडे सुपुर्द करण्यात आली होती.
शिवराज्याभिषेक सोहळ्यात या ४० किलो मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. तर पालखीदेखील सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आली.
मी जावळीचा मावळा
गेल्या ११ महिन्यांत सरकारने घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे आहे. मी जावळीचा मावळा असल्याने शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कामकाज केले जाईल.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सर्वधर्मसमभावाचा विचार
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले साम्राज्य हे सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेले सुराज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार जतन केला पाहिजे, असे सांगत सध्या दोन धर्मांत जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जात असल्याबाबत खा. उदयनराजे भाेसले यांनी खेद व्यक्त केला.