रायगडावर २ आणि ६ जून रोजी रंगणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, कामाच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 10:56 AM2023-05-13T10:56:52+5:302023-05-13T10:57:54+5:30
खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणें पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे.
जमीर काझी
अलिबाग: हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर 2 व 6 जूनला 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी प्रत्यक्ष स्थळपाहणी व आढावा बैठक शनिवारी सकाळी रायगड किल्ल्यावर झाली. दोन्ही दिवशी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी अभिवादनासाठी रायगडावर येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी बाळगावी , त्याच्यासाठी पाणी व अन्य सुविधा,,सुरक्षा ,वाहन व्यवस्थामध्ये कोणतीही कसर ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणें पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे. त्यामुळे त्याच्या तयारीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे.
आज रायगडवर झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील ,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, कार्यकारी अभियंता नामदे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, महाड प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, तहसिलदार विशाल दौंडकर, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिवराज्याभिषेक समितीचे व कोकण कडा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.