महाड तालुक्यातील ३६ गावांना दरडींचा धोका
By admin | Published: June 17, 2017 01:52 AM2017-06-17T01:52:29+5:302017-06-17T01:52:29+5:30
जुलै २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांवर दरडी कोसळलेल्या दुर्घटनेला आज बारा वर्षे लोटली.
- लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : जुलै २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांवर दरडी कोसळलेल्या दुर्घटनेला आज बारा वर्षे लोटली. मात्र या दरडींचा या तालुक्याला धोका अद्यापही कायम आहे. भूगर्भ सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३६ गावांना धोका संभवत आहे. दरडींचा हा धोका लक्षात घेऊन महसूल विभागाने महाड तालुक्यात आतापासूनच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे. मात्र आपत्ती निवारण कक्ष राबविण्यात येणाऱ्या महसूल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदारसह अनेक पदे रिक्त असल्याने ही यंत्रणा राबविण्याचे आव्हान महसूल यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे.
२००५ च्या नैसर्गिक आपत्तीत दरडी कोसळून महाड तालुक्यातील दोनशेहून अधिक जणांचे बळी गेले होते, तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली होती. महाड शहरासह तालुक्यातील दासगाव, रायगडवाडी, कोथुर्डे, नडगावतर्फे बिरवाडी, चोचिंदे, मुठवली, वाकीबुद्रुक, चिंभावे, कोसबी, मांडले, लोअर तुडील, मुमुर्शी, शिंगरकोंड, आंबेशिवतर, कुंभेशिवतर, कोंडीवते, रावतळी, आंबिवली, कोथेरी, खैरेतर्फे तुडील, मोहोत, रोहन, मुठवली, सव, कुर्ले, पिंपळकोंड, वराठी, कुंबळे, रावतळी या गावांसह वाड्यांचा दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांमध्ये समावेश आहे.
महाड तालुक्यात कार्यान्वित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, शिपाई अशा १२३ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाड तालुक्यात तहसीलदार औदुंबर पाटील यांच्यासह नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्याने महसूल विभागातील अनेक पदे रिक्त आहेत.
सुषमा सातपुते यांच्या जागी विठ्ठल इनामदार प्रांताधिकारी म्हणून नव्याने रुजू झाले आहेत. दरम्यान, या दरडप्रवण गावांवर दरडींची टांगती तलवार असल्याने पावसाळ्यात या धोकादायक गावातील ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागणार आहे.