महाडमध्ये ३७ अंगणवाड्यांना फटका; चक्रीवादळाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:37 PM2020-06-15T23:37:59+5:302020-06-15T23:38:20+5:30

अंदाजे ४० लाखांच्या निधीची आवश्यकता

37 Anganwadis hit in Mahad; Hurricane damage | महाडमध्ये ३७ अंगणवाड्यांना फटका; चक्रीवादळाने नुकसान

महाडमध्ये ३७ अंगणवाड्यांना फटका; चक्रीवादळाने नुकसान

Next

- सिकंदर अनवारे

दासगाव : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका शासकीय अंगणवाड्यांनाही बसला असून महाड तालुक्यातील ३७ अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास विभागाकडून पाठवण्यात आले आहेत.

संपूर्ण कोकणात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. नैसर्गिक हानीबरोबर घरांचे आणि शासकीय इमारतींचेदेखील नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील एकात्मिक बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांनाही फटका बसला असून तालुक्यातील जवळपास ३७ अंगणवाड्यांचे छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. यामुळे अंगणवाड्यांतील शैक्षणिक आणि सकस आहाराचेही नुकसान झाले आहे. या अंगणवाड्या गावाच्या शेजारी किंवा गावात असल्याने वाऱ्याच्या वेगाने छप्पर उडून गेले आहेत. या अंगणवाड्या सध्या बंद आहेत. मात्र भविष्यात अंगणवाड्या सुरू झाल्या तर बालकांना कुठे बसवायचे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. महाडमधील चिंभावे मोहल्ला, आचलोळी, पुनाडे, कोंडराण, वाघोली, वरांडोली, कोंझर, तळोशी, आढी, रावतली, आंबवडे, नाते बौद्धवाडी, वहूर उगवतवाडी, विन्हेरे पारदुलेवाडी, केंबुर्ली, बिजघर, वालसुरे, वाघेरी, शिरसवने, शेंदूरमलई, ताम्हाणे, वसाप, उगवतकोंड, पांगारी, कुंभार्डे आदिवासी वाडी, घावरेकोंड, बेबलघर, कोथुर्डे, कोथुर्डे सोंडेवाडी, चापगाव, निजामपूर, सोनघर, वीर टेंबेवाडी, वीर गोठलवाडी, वीर, कोथुर्डे सोनारवाडी, नांदगाव बु. या गावांतील अंगणवाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती महाड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी दिली.

इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाठवला प्रस्ताव
महाड तालुक्यातील अनेक अंगणवाड्या यापूर्वीच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय काही गावांत स्वत:च्या इमारती नसल्याने गावातील सार्वजनिक किंवा खासगी इमारतीमध्ये अंगणवाड्या सुरू आहेत.
नवीन इमारती मिळाव्या म्हणून प्रस्ताव खितपत पडून असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अवकृपा दाखवत अंगणवाड्यांचेदेखील नुकसान केले आहे. अंगणवाड्या दुरुस्त करण्याबाबत पंचनामे करून जवळपास ४० लाखांचा निधी आवश्यक आहे.
याबाबतचा प्रस्तावही जिल्हा एकात्मिक बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र राज्यातील एकूण स्थिती आणि कोकणातील नुकसान पाहता या नुकसानग्रस्त अंगणवाड्यांना कधी निधी मिळेल हा एक प्रश्नच आहे.
मात्र भविष्यात बालकांना अंगणवाडीविना बसावे लागणार असे चिन्ह निर्माण झाले आहे. महाड तालुक्यात ३७ अंगणवाड्या निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झाल्या असून दुरुस्तीबाबत जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी सांगितले

Web Title: 37 Anganwadis hit in Mahad; Hurricane damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.