पेण : पेणच्या अतिदुर्गम भागातील रावे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रावे मोराकोठा या लोकवस्तीसाठी रावे गावचे रहिवासी व राज्याचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने रावे मोराकोठा पाणी योजनेला मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्टÑीय पेयजल योजनेंतर्गत या योजनेचे अंदाजपत्रकीय रक्क म ३७ लाख मंजूर झाले आहे. राज्यात स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून या योजनेचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरीचे पत्र भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील व आमदार निरंजन डावखरे यांना सुपूर्द करण्यात आले. रावे मोराकोठा हा समुद्र खाडीत वसलेले बेट असून अशा दुर्गम ठिकाणी ही योजना मंजूर झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.
पेणचे रावे गाव हे दुर्गम भाग असून समुद्र खाड्यांनी चारही बाजूंनी वेढलेले बेट सदृश आहे. त्यामुळे रावे मोराकोठा येथील रहिवाशी समुद्र खाड्यातून होडीने खारपाडा पुलावरील कर्नाळा नाका येथे जावून तेथून पाणी प्लॅस्टिक टाक्यामध्ये भरून होडीतून परत मूळ ठिकाणी जात असत. अर्धा किमीचा हा समुद्र मार्गातील प्रवास पावसाळी हंगामात किंवा वादळी वाऱ्यात या लोकांना जीवावर उदार होवून पाण्यासाठी करावा लागत असे. आता या योजनेला मंजुरी मिळाल्याने येत्या डिसेंबरपर्यंत या योजनेचे काम मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात येईल, असे वैकुंठ पाटील यांनी सांगितले. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या योजनेसाठी ३७ लाखांचा निधी मंजूर केल्याने पाणी प्रश्न निकाली निघाला आहे, असे पाटील म्हणाले.